ठाण्याची स्वागतयात्रा बेशिस्तच
By admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:45+5:302016-03-16T08:36:45+5:30
ठाण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात येणारी स्वागतयात्रा ही अत्यंत बेशिस्त असते, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विक्रांत वाड यांनी सोमवारी स्वागतयात्रेसंदर्भात
ठाणे : ठाण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात येणारी स्वागतयात्रा ही अत्यंत बेशिस्त असते, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विक्रांत वाड यांनी सोमवारी स्वागतयात्रेसंदर्भात झालेल्या बैठकीत केली. त्यावर गुढीपाडव्याला निघते ती यात्रा आहे, परेड नव्हे, असा टोला कार्यकारिणी सदस्य विद्याधर वालावलकर यांनी लगावला. त्यामुळे नियोजनासाठी आयोजित या बैठकीत आरोप-प्रत्यारोपांची ‘शोभायात्रा’ उपस्थितांनी अनुभवली.
वाड यांनी बेशिस्तपणे चाललेल्या स्वागतयात्रेचा विचार व्हावा. गोखले रोडवर यात्रा अडकते आणि त्याचा त्रास वाहतुकीला होतो. त्यामुळे मान्यवरांचे तीन गट असावे. एक पालखीबरोबर, दुसरा मध्यभागी आणि तिसरा शेवटी अशी सूचना केली. वाड यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत समाजातील प्रवाहाला स्वयंशिस्त असते. त्याला शिस्त लावू नये व बेशिस्त तर मुळीच म्हणू नये. स्वागतयात्रा ही यात्रा आहे, परेड नव्हे अशा शब्दांत वालावलकर यांनी उत्तर दिले. वाड-वालावलकर यांच्यातील ही चकमक पाहून शिस्त सर्वांनीच पाळली पाहिजे, अशा शब्दांत श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष मा.य. गोखले यांनी सारवासारव केली.
श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याबाबत विश्वस्त व कार्यकर्त्यांची सभा सोमवारी पार पडली.
ब्रह्मांड कट्ट्याचे राजेश जाधव यांनी आम्ही गेली १३ वर्षे ब्रह्मांड परिसरात स्वागतयात्रा काढत असून यंदा मार्गांमध्ये बदल केला जाईल, असे सांगितले.
कळवा सांस्कृतिक प्रतिष्ठानचे गोविंद पाटील यांनी कळव्यात काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रेत यंदा महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा अपव्यय टाळा असा संदेश दिला जाणार असल्याचे सांगितले. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला उपवन तलावाभोवती दीपोत्सव साजरा केला जाईल, असे सांगितले. स्वागतयात्रेसाठी न्यासाच्यावतीने निधी मिळाला तर बरे होईल, अशी अपेक्षा महेंद्र देशमुख यांनी व्यक्त केल्यानंतर अध्यक्ष गोखले यांनी स्वागतयात्रांतर्गत निघणाऱ्या उपयात्रांना एक लाख निधी देण्याची आमची इच्छा असते, परंतु सध्या आमच्याच तिजोरीत चणचण असल्याचे सांगितले.
संस्कारभारतीच्या वतीने दरवर्षी काढण्यात येणारी रांगोळी यंदा गावदेवी मैदानात काढली जाईल व रांगोळीचा विषय पाणी हा असणार आहे, असे शमिका यांनी सांगितले.
ढोकाळीच्या सुनिता वळवे यांनी यंदाच्या स्वागतयात्रेत महिलांची एका वेगळ््या थीमवर बाईक रॅली काढण्यात येणार असून जवळपास २५ महिला या रॅलीत सहभागी होणार आहे. वेदिका कुलकर्णी यांनी स्वागतयात्रेच्या छायाचित्रांची स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. रोटरी क्लब आॅफ ठाणे यांच्यावतीने स्वागतयात्रेला ५० हजारांचा निधी देणार आहेत.
यंदाच्या पाडव्याला
‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’
यंदाच्या स्वागतयात्रेत तरुणांच्या सहभागावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही स्पर्धा राबविण्यात येणार असून, विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, यंदा प्रथमच जोशी बेडेकर महाविद्यालय व ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे निमंत्रक मयूरेश जोशी यांनी सांगितले.
येऊरच्या आदिवासी पाड्यांमध्येही निघणार मिरवणूक
गतवर्षीप्रमाणे यंदाही येऊर गावात स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने येऊरचे सातही पाडे व येऊर गाव यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या प्रतिनिधी ज्योती जपे यांनी सांगितले.