श्रमजीवीच्या नेतृत्वाखाली कंत्राटी मजुरांचे पगारासाठी आयुक्त दालना बाहेर ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 08:47 PM2019-07-08T20:47:14+5:302019-07-08T20:48:55+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ श्रमजीवी कामगार संघटनेने उदद्यान विभागातील कंत्राटी मजुरांसह आयुक्तांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन केले.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ श्रमजीवी कामगार संघटनेने उदद्यान विभागातील कंत्राटी मजुरांसह आयुक्तांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन केले. गेल्या दोन महिन्यां पासुनचा पगारच या मजुरांना मिळाला नसल्याने ते संतप्त झाले होते. अखेर आयुक्तांनी ठेकेदाराचे पगारा पोटीची अडकलेली देयके तत्काळ देण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याने मंगळवारी सकाळी पगार खात्यात पडण्याच्या आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मीरा भार्इंदर महापालिकेच्या उद्यान विभागात सुमारे ३६० कंत्राटी मजुर काम करतात. महापालिकेची उद्याने, खेळाची मैदाने, स्मशानभूमी, चौक, रस्ते दुभाजक देखभाल आदींसह झाडांची छाटणी वगैरे कामं हे मजुर करत असतात. परंतु आधीच्या ठेकेदारास बाजुला करत मर्जीतील सैनिक सिक्युटीरी या ठेकेदारास परस्पर नियमबाह्यपणे मजुर पुरवठ्याचा ठेका देण्यात आला. त्यातुनच परस्पर नेमलेल्या ठेकेदारा मार्फत उद्यान विभागातील कंत्राटी मजुरांचे वेतन कसे काढायचे ? असा पेच निर्माण झाला.
परंतु सदर मजुर श्रमजीवी कामगार संघटनेचे सदस्य असल्याने त्यांना पगार पालिका ठेकेदारा मार्फत काढुन देत आली आहे. परंतु मे व जुन महिन्याचा पगार न केल्याने संघटनेने ठेकेदारास या बाबत विचारणा केली असता पालिकेने चार महिन्याच्या वेतनाची रक्कमच दिली नसल्याचे स्पष्ट केले. पालिकेने मजुरांच्या पगाराची रक्कम न दिल्याने ठेकेदाराने देखील मजुरांना पगार देणे शक्य नसल्याचे कळवले होते.
पगारासाठी आज सोमवारी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वा खाली मजुरांनी पालिका मुख्यालयात आयुक्त दालना बाहेर पगारासाठी ठिय्या आंदोलन केले. मजुरांनी ठिय्या मारल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. आयुक्त दालनच जाम करुन टाकण्यात आले. घोषणांनी पालिका दणाणुन सोडली. दोन महिन्यां पासुन आम्हाला कष्टाचा मोबदला मिळालेला नाही असे सांगत आमच्या कुटुंबियांनी जगायचे तरी कसे ? असा सवाल या मजुरांनी केला.
आयुक्त बालाजी खतगावकर यांनी तातडीने पालिका अधिकारायांसह श्रमजीवी कामगार संघटनेचे यूनिट अध्यक्ष चेतन पाटील, उपाध्यक्ष मंगेश मोरे , हरेष शीप्रे , विकास पाटील, गिरीष पाटील , रमेश गोरेकर , दीपक पाटील , दिगंबर मेहर आदी दालनात चर्चेसाठी बोलावले. ठेकेदाराच्या व्यवस्थापकास सुध्दा पाचारण केले.
महापालिका प्रशासन ठेकेदाराची देयके अडवत असल्याचे यातुन समोर आले. पालिकेत देयके मंजुर करण्यासाठी चालणारी टक्केवारी याची कुजबुज झाली. तर ठेकेदारच त्याच्या देयकांसाठी पाठपुरावा करत नाही. त्याने पाठपुरावा केला पाहिजे असा कांगावा प्रशासना तर्फे केला गेला. आयुक्तांनी मुख्यलेखाधिकारी शरद बेलवटे यांच्या सोबत जाऊन मजुरांच्या पगाराच्या प्रलंबित देयकांवर सह्या घेण्यास सांगीतले. त्या नंतर संघटनेचे प्रमुख पदाधिकारी हे ठेकेदारा सोबत अधिकारायां कडे गेले व प्रलंबित देयकांवर सह्या घेतल्या. परंतु दुपार नंतर बँक बंद झाल्याने मंगळवारी सकाळी मजुरांचा पगार खात्यात जमा केला जाईल असे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.