कुठल्याही परिस्थितीत रस्ता रुंदीकरण होणारच!

By admin | Published: January 14, 2017 06:26 AM2017-01-14T06:26:03+5:302017-01-14T06:26:03+5:30

मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर-४ मध्ये अटल आदर्श वॉर्ड योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी इमारत व दुकानांपुढील मोकळी

Under no circumstances will the road widening! | कुठल्याही परिस्थितीत रस्ता रुंदीकरण होणारच!

कुठल्याही परिस्थितीत रस्ता रुंदीकरण होणारच!

Next

मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर-४ मध्ये अटल आदर्श वॉर्ड योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी इमारत व दुकानांपुढील मोकळी जागा घेण्याचा प्रयत्न पालिकेने पुन्हा केला असता नागरिकांनी विरोध केला. आयुक्तांनी राजकारणी नको, असे सांगत काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यासह पालिका प्रभाग समितीचे अध्यक्ष, गटनेते यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला. केवळ दुकानदारांशी चर्चा करत ती जागा पालिकेची असून ताब्यात घेणारच, असे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी स्पष्ट केले.
सत्ताधारी भाजपा युतीने शांतीनगरमधील प्रभाग ३६ पूर्ण व ३८ अंशत: अटल आदर्श वॉर्ड योजनेत समाविष्ट केले आहे. या योजनेनुसार पूर्वीचा असलेला सुमारे ४० फूट रस्ता आणखी रुंद करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी पालिकेने इमारती व दुकानांसमोर असलेली जागा ताब्यात घेऊन त्यानुसार गटार बांधकामासाठी खोदकाम चालवले आहे. परंतु, येथील दुकानदारांचा विरोध असून गेल्या महिन्यात सेक्टर ५-६ दरम्यान रस्ता रुंदीकरणास गेलेल्या पालिका पथकाचे काम नागरिकांनी बंद पाडले होते. त्यावेळी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन आंदोलनात उतरले होते.
दरम्यान, गुरुवारी पालिकेने सेक्टर-४ मधील रस्ता रुंदीकरण हाती घेतले. त्यावेळीही दुकानदारांनी विरोध करत काम थांबवले. पालिकेचे तसेच नयानगरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सरकारी कामात अडथळा आणू नका,असे पोलीस सांगत होते. तर, पालिकेच्या जमिनीच्या मालकीचा ७/१२ दाखवा, असे दुकानदारांनी सांगितले. काही वेळातच स्वत: हुसेन यांच्यासह सभापती प्रमोद सामंत, काँग्रेस गटनेते जुबेर इनामदार, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, माजी नगरसेवक चंद्रकांत मोदी, शफिक खान तेथे आले. त्यांनीही आधी फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढा, असे पालिका व पोलिसांना सुनावले.
पालिकेच्या नावे जागाच नसून सरकारनेही अहवाल मागवला आहे. असे असताना पालिकेने आवश्यकता नसताना नियम धाब्यावर बसवून दडपशाही सुरू केली आहे, असा आरोप हुसेन यांनी केला. तर, कोट्यवधी रुपयांच्या कामातील टक्केवारी व विकासकाला आणखी चटईक्षेत्र मिळावे, म्हणून हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप सामंत यांनी केला.
दरम्यान, आयुक्तांना सायंकाळी हुसेन यांच्यासह नागरिकांचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी गेले असता आयुक्त गीते यांनी शांतीनगर रस्तारुंदीकरण विषयावर चर्चा करण्यास नकार दिला. त्यांनी केवळ दुकानदारांना बसवून त्यांच्याशी चर्चा केली. फेरीवाल्यांना हटवले तरी रस्ता मोकळा होईल, अशी दुकानदारांनी आपली भूमिका मांडली. पण, आयुक्तांनी जागा पालिकेची असूनरुंदीकरण होणारच, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Under no circumstances will the road widening!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.