भूमिगत गटार योजना निष्प्रभ ठरल्याचे उघड
By admin | Published: June 27, 2017 02:58 AM2017-06-27T02:58:14+5:302017-06-27T02:58:14+5:30
पालिकेकडून मोठे व लहान पक्या नाल्यांची सफाईच झाली नसल्याने पाणी साचल्याच्या घटना घडल्या. उंच केलेले रस्ते पाणी साचण्याचे कारणीभूत ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : पालिकेकडून मोठे व लहान पक्या नाल्यांची सफाईच झाली नसल्याने पाणी साचल्याच्या घटना घडल्या. उंच केलेले रस्ते पाणी साचण्याचे कारणीभूत ठरले. तर कोट्यवधी रूपये खर्चाची भूमिगत गटार योजनाही निष्प्रभ ठरल्याचे समोर आले.
काँक्रीटचे पक्के लहान मोठे नाले बांधले पण त्याची सफाईच झाली नाही. जागोजागी प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आदी कचरा अडकल्याने ते काढायचे काम नागरिकच करत होते. दुपारच्या भरती मुळे नवघर गाव, इंदिरानगर, शिवशक्तीनगर आदी खाडी जवळील भागात भरतीचे पाणी आले. आयुक्त नरेश गीते यांनी शहर अभियंता शिवाजी बारकुंड, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्यासह खाडीची पाहणी केली. उपमहापौर प्रवीण पाटील, नगरसेविका संध्या पाटील, वंदना विकास पाटील आदींसह नागरिक जमले होते. येथे झालेल्या झोपड्या व भराव हटवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. शिवाय चाळघर, शंकर नारायण महाविद्यालय नाला व इंदिरा नगर खाडी येथे उघाडी करुन दरवाजे बसवण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली.
मीरा रोडच्या नयानगर, शांतीनगर, शांतीपार्क, विजय पार्क, आरएनए आदी सखल भागातील वसाहतीं मध्ये पाणी शिरले होते. काशिमीऱ्याच्या संजय गांधी उद्यानाच्या डोंगर पट्यातून पावसाचा मोठा लोंढा आल्याने काशिमीरा, लक्ष्मीबाग, मुन्शी कंपाऊंड, अमिषा पार्क आदी परिसर पाण्याखाली गेला होता.