प्रकल्पांबद्दलचा विरोध समजून घ्यावा; जमिनीच्या बदल्यात स्थानिकांना मिळत नाही भरपाई, डॉ. अनिल काकोडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 01:31 PM2023-07-31T13:31:07+5:302023-07-31T13:31:44+5:30
जमिनीच्या बदल्यात तेथील स्थानिकांना भरपाई मिळत असली तरी ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकल्पांना विरोध होणे हे साहजिकच असते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
ठाणे : नाणार, जैतापूर प्रकल्पांना होणारा विरोध हा समजून घेतला पाहिजे. कोणताही मोठा प्रकल्प येतो, त्या वेळी मोठ्या प्रमाणात जमिनीचे अधिग्रहण केले जात असल्याने लोकांच्या जीवनावरच अतिक्रमण होते. लोकांचा अनुभव बऱ्याच ठिकाणी फारसा चांगला नाही. जमिनीच्या बदल्यात तेथील स्थानिकांना भरपाई मिळत असली तरी ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकल्पांना विरोध होणे हे साहजिकच असते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
वैष्णो व्हिजन आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सहयोग मंदिर येथे ‘भेट दिग्गजांची’ या कार्यक्रमांतर्गत डॉ. काकोडकर यांची जाहीर मुलाखत झाली. डॉ. काकोडकर म्हणाले की, जैतापूर प्रकल्पाला एक लक्ष कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. नाणार प्रकल्पाला देखील अशा प्रकारची गुंतवणूक आहे. यात मात्र बाहेरच्या लोकांचा आणि स्थानिकांचा किती फायदा होतो, यातून समाजात तेढ निर्माण होते. कोणत्याही प्रकल्पाबाबत समाजप्रबोधन आधी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हल्ली प्रकल्पांना विरोध करायलादेखील कोट्यवधी रुपये वाटले जातात. प्रकल्पांमुळे समाजावर परिणाम होतो हे नक्की, पण तो सकारात्मक व्हावा, स्थानिकांना हा प्रकल्प पटला पाहिजे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण तसे नाही ज्याने चांगला परिणाम होईल, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण, ज्येष्ठराज जोशी, सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, वैष्णो व्हिजनचे जयू भाटकर, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर आदी उपस्थित होते.
समाजमनात अणुशक्तीबाबत खोलवर भीती
आजही अणुशक्तीबाबत बरेच समज-गैरसमज आहेत. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मोठी स्थित्यंतरे होतात तेव्हा असे गैरसमज निर्माण होत असतात. अणुशक्तीची ओळखच हिरोशिमा, नागासाकीपासून झाल्याने गैरसमज आहे. अणुशक्तीतून वीजनिर्मिती व अनेक फायदे लोकांसमोर नंतर येतात. त्यामुळे समाजमनात अणुशक्तीबाबत भीती खोलवर दडली आहे. जग पुढे बदलणार आहे. त्यामुळे आणखी ऊर्जा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.