आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम उधळण्याचा अभाविपचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:34 AM2019-07-12T00:34:38+5:302019-07-12T00:35:30+5:30

मुरलीधर भवार । लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात कुठल्याही घटनात्मक पदावर नसलेल्या युवासेनाप्रमुख आदित्य ...

Undeterred efforts of hoisting Aditya Thackeray's program | आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम उधळण्याचा अभाविपचा प्रयत्न

आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम उधळण्याचा अभाविपचा प्रयत्न

googlenewsNext

मुरलीधर भवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात कुठल्याही घटनात्मक पदावर नसलेल्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना गुरुवारी बोलावल्यामुळे या कार्यक्रमात भाजपशी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह भाजपच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाला दांडी मारली होती. त्यामुळे मंत्र्यांची अनुपस्थिती व अभाविपची निदर्शने यांचा परस्पर संबंध असल्याची चर्चा सुरू आहे.


मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर हे भाषण करीत असताना अभाविपच्या एका कार्यकर्त्याने निषेधाच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र तत्पूर्वी शिवसैनिक व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तावडे हे कार्यक्रमास उपस्थित नव्हते. त्यामुळे अभाविपच्या आंदोलनाची कुणकुण लागल्यानेच तावडे यांनी कार्यक्रमाला दांडी मारली किंवा कसे, असे तर्कवितर्क केले जात आहेत. कल्याण उपकेंद्र तातडीने सुरू केले नाही, तर महापालिकेने दिलेली जागा परत घ्या, अशी तंबी आदित्य यांनी अलीकडेच दिली होती. त्याची दखल घेत कुलगुरूंनी तातडीने शुभारंभाचा कार्यक्रम जाहीर केला. कार्यक्रमपत्रिकेवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते उपकेंद्राचा शुभारंभ होणार, तर आदित्य हे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे असतील, असे नमूद केले होते.

विद्यापीठ राजकारणात अभाविप व युवासेना हे प्रतिस्पर्धी असून ठाकरे हे कुठल्याही घटनात्मक पदावर नसल्याने त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यास अभाविपने विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे कार्यक्रमस्थळी येण्यापूर्वी अभाविपचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी निषेधाच्या घोषणा देत पोहोचले. लागलीच पोलिसांनी ३५ कार्यकर्त्यांना गाडीत कोंबले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशद्वाराबाहेर मूक निदर्शने केली. विद्यापीठाचे उपकेंद्र मार्गी लागावे, यासाठी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी पाठपुरावा केला होता. मात्र त्यांचे नाव कार्यक्रमपत्रिकेवर टाकले नाही. तसेच विद्यापीठाने त्यांना रीतसर आमंत्रण दिलेले नाही, अशी मनसैनिकांची तक्रार होती.


आदित्य ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर कुलगुरू पेडणेकर भाषणाला उभे राहिले. लागलीच अभाविपचा एक कार्यकर्ता निषेधाच्या घोषणा देत व्यासपीठाच्या दिशेने धावत गेला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. त्याला पकडण्याकरिता पोलीस धावले त्याचबरोबर शिवसैनिकही धावले. शिवसैनिकांनी त्याला मारहाण केली. लागलीच पोलिसांनी त्यांच्या तावडीतून त्याची सुटका करून त्याला बाहेर नेले. कार्यक्रमात अभाविपचे कार्यकर्ते गोंधळ घालणार, याची कुणकुण लागल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सभागृहात अभाविपचे कार्यकर्ते बसलेले नाहीत ना, याची खात्री करून घेण्यास बजावले होते. घोषणा देणाºया कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर कुलगुरूंनी आपले थांबलेले भाषण

भाजपची अनुपस्थिती
कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तावडे न आल्याने भाजपचे खा. कपिल पाटील व स्थानिक आ. नरेंद्र पवार हे देखील उपस्थित राहिले नाहीत. तसेच भाजपचे नगरसेवकही अनुपस्थित होते. भाजपच्या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमावर शिवसेनेचा वरचष्मा होता.

मोबदला मिळालेला नाही
या कार्यक्रमात विद्यापीठाला जागा देणारे वायले व सुतार कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. मात्र सत्कार स्वीकारतानाच सुभाष सुतार यांनी त्यांना जागेचा मोबदला मिळालेला नाही, असे सांगून जाहीर नाराजी प्रकट केली.पूर्ण केले.


कुलगुरूंनीच आणले राजकारण
अभाविपचे कोकण प्रदेशमंत्री अनिकेत ओहळ म्हणाले की, परिषदेच्या ६० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कल्याण उपकेंद्राच्या कार्यक्रमात कुलगुरूंनीच राजकारण आणले आहे. विद्यापीठात राजकारण आणू नये, असे त्यांचेच म्हणणे आहे. मात्र त्यांनी कोणतेही घटनात्मक पद नसलेल्या व्यक्तीला कार्यक्रमाला बोलावले. परिषदेच्या कार्यकर्त्यांचा आदित्य यांना विरोध नव्हता, तर कुलगुरूंच्या निर्णयाला विरोध होता.
अभाविपचा गनिमी कावा
अभाविपने नियोजनबद्ध निषेध आंदोलन केले. काही कार्यकर्त्यांना अटक झाल्यावर आंदोलनकर्ते गेले, या भ्रमात पोलीस व शिवसैनिक राहिले. मात्र काही कार्यकर्ते सभागृहात बसले होते. त्यापैकीच एका कार्यकर्त्याने निषेधाच्या घोषणा दिल्या.अभाविपच्या या गनिमी काव्याने शिवसेनेला जे टाळायचे होते, ते टाळता आले नाही.
प्रशासनाचा भेदभाव उघड
स्टुडंट अ‍ॅक्शन फ्रंटचे प्रमुख प्रा. प्रशांत इंगळे यांनी सांगितले की, उपकेंद्रासाठी फ्रंटने आंदोलने केली.मात्र कार्यक्रमास इंगळे यांनाही आमंत्रित केले नव्हते. प्रशासनाला फोन केल्यावर गुरुवारी सकाळी कार्यक्रमास या, असे सांगितले.

Web Title: Undeterred efforts of hoisting Aditya Thackeray's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.