सदोष तलाठी भरती रद्द करण्यासाठी ठाण्यात बेरोजगार आक्रोश मोर्चा
By सुरेश लोखंडे | Published: January 30, 2024 05:34 PM2024-01-30T17:34:21+5:302024-01-30T17:34:21+5:30
ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन हा मोर्चा काढला.
ठाणे : सदोष सरकारी नोकर भरतीमधील पेपरफुटीचे सबळ पुरावे देऊनसुद्धा राज्य सरकारने त्याविरोधात काही प्रतिसाद दिलेला नाही, असा आरोग्य करीत शासनाने या ‘सदोष तलाठी भरती’चा निकाल ७ दिवसांपूर्वी लावल्यामुळे आम आदमी पार्टीच्या (आप)कार्यकर्त्यांनी त्याविरोधात आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर 'बेरोजगार आक्रोश मोर्चा' काढला. या सदोष तलाठी भरतीला रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सदोष नोकर भरतीच्या विरोधात आपने आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा बेरोजगार आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यानी सहभाग घेऊन हा मोर्चा काढला. या दरम्यान या युवकांनी विविध घोषणा देत या पेपरफुटी प्रकरणी न्यायालयाच्या निगराणीखाली ‘विशेष चौकशी समिती’ची स्थापना करण्याची प्रमुख मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी लावून धरली आहे. यावेळी मोर्चेकऱ्यांनी सदोष तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून, तलाठी तसेच सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेतल्या जाव्यात, पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदे बनवावेत. पेपरफुटीतील गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण कायमचे रद्द करण्यात यावे, आदी मागण्या या मोर्चेकऱ्यांकडून राज्य शासनाकडे करण्यात आल्याचे या मोर्चातील जेष्ठ कार्यकर्ते सतीश सलुजाख्सं केत वाडकर यांनी स्पष्ट केले.