लोकसभेनंतर विरोधकांवर बेरोजगारीची वेळ - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:54 PM2024-03-07T12:54:30+5:302024-03-07T12:56:53+5:30
लोकसभेच्या निवडणुकीनंतर या विरोधकांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली...
ठाणे : डबल इंजिन सरकार राज्यात बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करीत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ आरोप करण्याचेच काम ते करीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर या विरोधकांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
ठाण्यात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, सदाभाऊ खोत आदींसह इतर पदाधिकारीही उपस्थित होते.
राज्यातील बंद झालेले प्रकल्प सुरू झाले आहेत. गडचिरोलीमधील नक्षलवाद संपल्याने आता नवनवे उद्योजक त्या ठिकाणी उद्योगांसाठी येत आहेत. त्यातून तेथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे ते म्हणाले. सरकारच्या माध्यमातून शासकीय नोकरीवरील बंदी हटविण्यात आली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून हातांना काम देण्यात येत आहे. आम्ही राम मंदिर बांधले, परंतु त्याचे राजकारण केले नसल्याचे सांगत ‘मुखी राम आणि प्रत्येकाला काम’ असे आमचे सरकार काम करीत असल्याचेही ते म्हणाले.
कौशल्य विकास प्रबोधिनीचे उद्घाटन
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कोपरीतील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधिनीचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. महापालिकेच्या माध्यमातून घरघंटी आणि शिलाई मशीनच्या ११ हजार लाभार्थींपैकी प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हस्ते वाटप केले. ठाणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या उष्णता उपाययोजना कृती आराखड्याचे (हिट ॲक्शन प्लॅन) उद्घाटनही यावेळी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र स्कोअर कार्ड उद्योजकता आणि महिला उद्योजक धोरण अहवाल याचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले.