अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले...

By admin | Published: July 29, 2016 02:43 AM2016-07-29T02:43:55+5:302016-07-29T02:43:55+5:30

आधारवाडी येथील रमाबाई आंबेडकरनगरातील बैठ्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर तेथील बांधकाम जमीनदोस्त केल्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकात काम करीत

Unfortunately, I had to wipe out my skill. | अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले...

अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले...

Next

- राजेश जाधव,  कल्याण
आधारवाडी येथील रमाबाई आंबेडकरनगरातील बैठ्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर तेथील बांधकाम जमीनदोस्त केल्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकात काम करीत असलेले रवींद्र गायकवाड यांचे कुटुंब बेघर झाले आहे. दुर्घटनेनंतर आलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी लंबीचौडी आश्वासने दिली. आता कुणीही दखल घेत नसल्याने गायकवाड यांची अवस्था ‘लोक भेटायास आले काढत्या पायांसवे, अन् अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले’, अशी झाली आहे.
गायकवाड सांगतात की, तीन दिवस आजूबाजूच्या लोकांनी आसरा दिला. मात्र, आता त्यांनी हात वर केले. पत्नी सुजाता, वयोवृद्ध आई, लग्नाची मुलगी रोहिणी आणि राकेश व रितेश ही दोन मुले यांना घेऊन कुठं जाऊ, कुठं राहू, असा प्रश्न पडला आहे. स्फोटानंतर बांधकाम पाडून साफ केलेल्या मोकळ्या जमिनीच्या तुकड्याकडे गायकवाड दिवसभर पाहत बसलेले असतात. गायकवाड यांच्यासारखीच स्थिती शेजारील आवारे व धनगर कुटुंबांची झाली आहे.
गायकवाड गेला महिनाभर आजारी आहेत. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता सिलिंडर स्फोटानंतर मुलगी जोरजोरात ओरडू लागली की, बाबा आपलं घर कोसळतंय. आयुष्यभराची कमाई खर्च करून बांधलेलं घर पडतंय, या कल्पनेनं पायाखालची जमीन सरकली. घराच्या खचलेल्या भिंती पाहून मनानं खचलो होतो. तेवढ्यात, शेजारच्या घरातील ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांच्या किंकाळ््या ऐकून त्यांना वाचवायला धावलो.
महापौर राजेंद्र देवळेकर भेटायला आले तेव्हा मी त्यांना माझी व्यथा सांगितली. ते म्हणाले की, काही काळजी करू नकोस. मात्र, अद्याप कुठलीच मदत मिळाली नाही की, आसरा घेण्याची पर्यायी व्यवस्था झाली नाही. आमच्या अंगावर धड कपडे नाहीत. आई नेसलेल्या लुगड्यानिशी तीन दिवस वावरत आहे. मुलीला कुणीतरी ड्रेस बदलायला दिला. मला शेजाऱ्यापाजाऱ्यांनी शाल पांघरायला दिली. गेले तीन दिवस तीच अंगाभोवती गुंडाळून फिरतोय, असं गायकवाड यांनी सांगितलं.

गायकवाड यांची पत्नी सुजाता म्हणाल्या की, स्थानिक आमदार, नगरसेवक कुणीही आमची विचारपूस करायला फिरकले नाहीत. श्रीमंतांचा एखादा टॉवर कोसळला असता तर त्यांचे अश्रू पुसायला हे सारे धावत आले असते. दोन वेळा काय खायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुले शिक्षण घेताहेत, मुलीचं लग्न करायचंय, असा प्रश्न आहे. पण मदतीसाठी कोणाचेही हात आमच्याकडे आलेले नाहीत.

Web Title: Unfortunately, I had to wipe out my skill.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.