दुर्दैवाने प्रेमकथावर आधारीत मराठी चित्रपट झाले नाही - स्वप्नील जोशी
By प्रज्ञा म्हात्रे | Published: February 3, 2024 06:38 PM2024-02-03T18:38:25+5:302024-02-03T19:01:47+5:30
सुयश कला-क्रीडा मंडळ, ठाणे पूर्व तर्फे श्री सिद्धिविनायक मंदिर पटांगण येथे सुरू झालेल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प जोशी यांच्या मुलाखतीने गुंफले.
ठाणे: प्रेम एकमेव भावना ती घेऊन आपण जन्मलो आहे. बाकी प्रत्येक भावना शिकवली गेली आहे. माझा प्रेम हा आवडता जॉनर आहे. प्रत्येक लव्हस्टोरी वेगळी असते. दुर्दैवाने मराठीत जास्त लव्हस्टोरीवर आधारीत चित्रपट नाही झाले. मला रोमँटीक चित्रपट आवडतात. प्रेमाची भाषा वेगळी असेल पण प्रत्येकाची लव्हस्टोरी ही असतेच अशा भावना सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केल्या.
सुयश कला-क्रीडा मंडळ, ठाणे पूर्व तर्फे श्री सिद्धिविनायक मंदिर पटांगण येथे सुरू झालेल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प जोशी यांच्या मुलाखतीने गुंफले. आपण जे पात्र साकारतो त्याचा प्रेक्षकांवर खूप मोठा परिणाम होत असतो हे सांगताना त्यांनी लहानपणी रामानंद सागर यांच्या रामायणात साकारलेल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी सांगितले. या भूमिकेमुळे एका व्यक्तीने सिगरेट सोडली आणि याला माझी भूमिका कारणीभूत ठरली याचा मला अभिमान आणि समाधान आहे. त्यानंतर त्यांनी ही मालिका कशी सोडली याचा उलगडा करताना जोशी म्हणाले की आजही लोकांना मी तो लहानपणीचा कृष्णच आठवतो.
रामानंद सागर माझ्यासाठी गुरु होते. ते पुढे म्हणाले की, हजारो लाखो ज्यांना तुम्ही ओळखत नाही त्यांना तुम्ही हवेहवेसे वाटणे यासारखे सुख, आनंद नाही. जोशी म्हणाले की, मी आता निर्मिती क्षेत्रात येत आहे. त्यामुळे मला आता निर्मात्यांची टेन्शन समजायला लागली, मी ही आता समंजस झालो आहे. मला नाटक हे सर्वात आवडता मध्यम आहे, पण पूर्ण तालीम केल्याशिवाय आणि पूर्ण वेळ देऊ शकणार असेल तरच मी नाटक करेन असे ते शेवटी म्हणाले. वृत्तनिवेदिका अनुपमा खानविलकर या त्यांना बोलते केले.