पोलीस निरीक्षक ममता डिसूझांना सर्वोत्कृष्ट तपासाचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 AM2021-08-13T04:46:20+5:302021-08-13T04:46:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : नवी मुंबईतील कामोठे भागातील अवघ्या पावणेतीन वर्षांच्या एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला २४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नवी मुंबईतील कामोठे भागातील अवघ्या पावणेतीन वर्षांच्या एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला २४ तासांमध्ये अटक करणाऱ्या कामोठे पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूझा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने दिले जाणारे सर्वोत्कृष्ट तपासाचे विशेष पदक गुरुवारी जाहीर झाले. या मुलीला न्याय मिळवून दिल्याने केलेल्या कामाचे चीज झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’ला दिली.
केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देशभरातील १५२ पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल ‘केंद्रीय गृहमंत्री पदक २०२१’ हे जाहीर झाले आहे. यात महाराष्ट्रातील ११ पैकी ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक डिसूझा यांचाही समावेश आहे. कामोठे पोलीस ठाण्यात त्या २०१६ मध्ये कार्यरत असताना एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. त्यावेळी त्यांची साप्ताहिक सुटी होती. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सुरुवातीला या मुलीला त्यांनी तत्काळ नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कामोठे पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह ‘बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२’ हा गुन्हा ११ जानेवारी २०१६ रोजी दाखल केला. याच गुन्ह्याचा तपास करताना परिस्थितिजन्य पुरावा (संशयित आरोपीच्या रक्ताचे नमुने, रक्ताळलेले कपडे) तत्काळ गोळा केले. यामध्ये पीडितेच्या मावशीचा पतीच आरोपी असल्याचे उघड झाल्याने त्याला त्यांनी परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच अटक केली. याच प्रकरणात शास्त्रोक्त तसेच न्यायसाहाय्यक वैज्ञानिक साधनांचा वापर करून अवघ्या एक महिना चार दिवसांमध्ये दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल केले. त्यानंतर अलिबाग (जि. रायगड) येथील सत्र न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेपेची तसेच २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षाच्या अतिरिक्त कैदेची शिक्षाही न्यायालयाने सुनावली.