उल्हासनगरातील शांतीप्रकाश आश्रमातील गौशाळेत रमले केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर
By सदानंद नाईक | Published: June 4, 2023 04:59 PM2023-06-04T16:59:06+5:302023-06-04T16:59:22+5:30
उल्हासनगरच्या एकदिवसीय दौऱ्यावर असलेले केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी सिंधी समाजाचे पवित्र स्वामी शांतीप्रकाश आश्रमाला भेट देऊन, उपस्थितांना मार्गदर्शन केले.
उल्हासनगर : एकदिवसीय शहर दौऱ्यात केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी स्वामी शांतीप्रकाश आश्रमाला भेट दिल्यावर, त्यांनी गौशाळेला भेट दिली. यावेळी ते गौशाळेत रमल्याचे दिसले. त्यांच्या सोबत देवप्रकाश महाराज, आमदार कुमार आयलानी, प्रकाश माखिजा, प्रदीप रामचंदानी यांच्यासह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगरच्या एकदिवसीय दौऱ्यावर असलेले केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी सिंधी समाजाचे पवित्र स्वामी शांतीप्रकाश आश्रमाला भेट देऊन, उपस्थितांना मार्गदर्शन केले. आश्रमाचे प्रमुख देवप्रकाश महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांनी गौशाळेला भेट दिली. त्यानंतर साई वशनशाह दरबाराला भेट देऊन, दरबारच्या ट्रस्टी सोबत विविध समस्या बाबत चर्चा केली. सिंधी समाजाचे धार्मिकस्थळ असलेले चालिया मंदिराला भेट देऊन, मंदिरातील सतत ७३ वर्ष तेवणाऱ्या ज्योतीचे दर्शन घेतले. रामरक्षा हॉस्पिटल ट्रस्टी सोबत बैठक झाल्यावर, त्यांनी सिंधू युथ सर्कलला भेट देऊन सिंधी संस्कृती बाबत माहिती जाणून घेतली. त्यांनी सभेवर भर न देता सिंधी समाजाच्या पवित्रस्थळाला भेट देऊन दुपारी भाजप जिल्हा कार्यालयाचे उदघाटन ठाकूर यांच्या हस्ते झाले.
कल्याण लोकसभेवर लक्ष केंद्रित करून अनुराग ठाकूर दौरा करीत असल्याचे शहरात बोलले जात असलेतरी, त्यांचा एकदिवसीय दौऱ्यात त्यांनी सिंधी समाजाच्या धार्मिकस्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम असल्याचे उघड झाले. गेल्या दोन दौऱ्यात शहर विकासावरून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच विकास कामासाठी निधीचे आश्वासन दिले होते. याबाबत त्यांनी बोलणे टाळल्याचे एकून चित्र होते. दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी टॉउन हॉल मध्ये शहरातील विविध व्यापारी संघटनेच्या सोबत चर्चा केली. तसेच त्यांच्या समस्या एकून सोडविण्याचे आश्वासन दिले. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्यावेळी आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, प्रदीप रामचंदानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरविकासाचा पडला विसर
केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी गेल्या दोऱ्यात शहरातील खड्डे भरण्याचे आश्वासन दिले होते. तसेच विविध समस्याचा आढावा घेऊन, त्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या रविवारच्या दौऱ्यात या सर्वांचा विसर पडल्याचे चित्र आहे.