केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा भिवंडीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 10:07 PM2021-08-19T22:07:54+5:302021-08-19T22:08:16+5:30
भिवंडी - भिवंडी लोकसभेचे खासदार असलेल्या कपिल पाटील यांची ७ जुलै रोजी केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागली असून त्याच्याकडे ...
भिवंडी- भिवंडी लोकसभेचे खासदार असलेल्या कपिल पाटील यांची ७ जुलै रोजी केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागली असून त्याच्याकडे केंद्रीय पंचायत राज मंत्री पदाचा कारभार सोपविण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्व नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांनी १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहून आपल्या खात्याविषयी माहिती घ्यावी, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील हे तब्बल चाळीस दिवसांनंतर १६ ऑगस्ट रोजी मुंबईत परतले. १६ ते २० ऑगस्ट, अशी पाच दिवस जन आशीर्वाद यात्रा आहे. मुंबईहून सुरू झालेली ही यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्यातून जात आहे. या यात्रेसोबत पाटील हे गुरुवारी तब्बल 44 दिवसांनंतर भिवंडीत दाखल झाले.
गुरुवारी सायंकाळी कपिल पाटील भिवंडीत दाखल झाले . सायंकाळी मुंबई नाशिक महामार्गावर वडपे गावाच्या हद्दीत भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनतर रांजणोली नाका येथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर त्यांनी साईबाबा मंदिरात साईंचे दर्शन घेत पुढे नवी वस्ती, धर्मवीर चौक, जुनी महापालिका येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत वंजारपट्टीनाका मार्गे छ. शिवाजी महाराज चौक येथे छ. शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर टिळक चौक , मंडई , गौरी पाडा , धामणकर नाका , कामतघर , ताडाळी मार्गे अंजूरफाटा, अशी जण आशीर्वाद यात्रा संपन्न झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोषात कपिल पाटील यांचे स्वागत केले.
गुरुवारी दिवसभर पावसाने रिमझिम हजेरी लावली असतांनाही भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने कपिल पाटील यांचे भिवंडी शहरात स्वागत केले. तर रिमझिम पावसामुळे मंत्री कपिल पाटील यांनी रेनकोट परिधान करून शहरवासीयांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान या जन आशीर्वाद यात्रेमुळे शहरात ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती, तर भिवंडी पोलिसांच्या वतीने शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.