पिरामल आर्ट रेसिडेन्सीच्या 'इटेरेशन्स इन वूड' मध्ये कलाकांरांनी साकरल्या अनोख्या कलाकृती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 11:58 AM2019-07-23T11:58:39+5:302019-07-23T12:05:53+5:30
ठाण्यातीस 'पिरामल आर्ट रेसिडेन्सी' यांनी सर्जनशील कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलाकारांना देशभरातील सहकारी व वरिष्ठांसोबत संवाद साधता यावा याकरिता एक प्रभावी मंच उपलब्ध करून दिला.
ठाण्यातीस 'पिरामल आर्ट रेसिडेन्सी' यांनी सर्जनशील कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलाकारांना देशभरातील सहकारी व वरिष्ठांसोबत संवाद साधता यावा याकरिता एक प्रभावी मंच उपलब्ध करून दिला. या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांची निवड एका निवड अर्ज प्रक्रियेमार्फत करण्यात आली होती. हा उपक्रम रेसिडन्सीच्या एका खास संकल्पनेवर आधारित असून या संकल्पनेचं नाव 'इटेरेशन्स इन वूड' असं होतं. यामध्ये वूडकट प्रिंट तयार करण्याच्या तंत्रावर भर देण्यात येतो. हे काम सर्जनशील असण्यासोबतच तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मकही होते.
या उपक्रमात देशभरातील अनेक नामांकित इन्स्टिट्यूट्यमधून अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेले सर्व कलाकारांनी याआधी आपल्या प्रतिकृती राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये मांडल्या होत्या. तसेच अनेक कलाकारांना ललित कला अकादमीसारख्या नामांकित संस्थांकडून अनेक सन्मान, पुरस्कार, राष्ट्रीय, राज्य स्तरीय पुरस्कार, फेलोशिप्स व शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत.
निवड झालेल्या सर्व कलाकारांनी महिनाभर रेसिडेन्सिमध्येच केलेल्या कामातून निवड झालेल्या प्रकल्पावर आधारित विविध वूडकट रिलिफ्स तयार केली. तसेच त्यांनी काही शांळांनाही भेटी देऊन काही कार्यशाळांमध्येही भाग घेतला. तसेच काही ख्यातनाम कलाकारांनीही त्यांना या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले.
छेरिन नेगी या सहभागी झालेल्या कलाकाराच्या रेसिडेन्सि प्रोजेक्टमध्ये वूडकट प्रिन्टमेंकिंगची सुरुवात विकास व पुनरुत्थान याच्याशी संबंधित आहे. त्यांनी तयार केलेल्या कलाकृतीमध्ये निसर्गाचा विशेष प्रभाव दिसून आला. तसेच
धृबाजीत शर्मा यांची कलाकृती फॅब्रिक्स व डिझाइन्स यांच्यावर आधारित असून त्यांनी याचा वापर प्रेमाचं प्रतीक म्हणून आणि आसामी, बोडो संस्कृतीच्या आदराप्रीत्यर्थ केला आहे. त्यांची कला आसाममधील सामुदायिक ओळख व सामाजिक अस्वस्थता दर्शवते.
समीर राव यांचं तंत्र एका अनोख्या प्रयोगावर आधारित आहे. यामध्ये त्यांनी दृष्टिकोन दर्शवण्यासाठी नैसर्गिक लाकडाचा वापर केला आहे.
सुचेता घाडगे या गेली बारा वर्षे वूडकट प्रिन्टमेकिंग तंत्रावर काम करत आहेत व त्यांच्या कामातून निसर्गातील खास करून नद्यांच्या संदर्भातील विभागणी, निचरा, वळण व विखंडन या संकल्पना दर्शविल्या जातात.
तेजस्विनी सोनावणे या वूडकट सोबत कपड्यावरील मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या मोनो-प्रिंट्स प्रमाणे काम करतात. धारावीमध्ये मृत प्राण्यांची कातडी कमावण्याचा व्यवसाय करणाऱ्या आपल्या कुटुंबासोबत राहताना आलेले अनुभव ही त्यांच्या कामाची प्रेरणा आहे. तेजस्विनी त्यांच्या कल्पना साकार करताना प्राण्यांचा वापर करतात, त्यातून त्या स्त्री-द्वेषाच्या भावनेबद्दल वाटणारी चिंता आणि हे स्त्रियांच्या अभिव्यक्तीमधून कसे दिसून येते तेही त्यांनी मांडलं आहे.