स्वातंत्र्यदिनी रंगला अनोखा फ्रीडम फ्लॅश मॉब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 02:53 AM2017-08-17T02:53:30+5:302017-08-17T02:53:33+5:30

फ्रीडम फ्लॅश मॉब’ आणि मुलांच्या नृत्याविष्काराला टाळ्यांची दाद देत उपस्थित मान्यवरांसह ठाणेकरांनी या फ्लॅशमॉबवर धरलेला ठेका, असे स्वातंत्र्य दिनाचे उत्साही वातावरण पाहायला मिळाले

Unique Freedom Flash Mob to Independence Day | स्वातंत्र्यदिनी रंगला अनोखा फ्रीडम फ्लॅश मॉब

स्वातंत्र्यदिनी रंगला अनोखा फ्रीडम फ्लॅश मॉब

googlenewsNext

ठाणे : मान्यवरांच्या हस्ते झालेले झेंडावंदन, त्यानंतर पालकांसह जमलेली हजारो मुले, हिंदी-मराठी देशभक्तीपर गीते सुरू होताच या मुलांनी एकत्र येत जोशपूर्ण वातावरणात सादर केलेला ‘ फ्रीडम फ्लॅश मॉब’ आणि मुलांच्या नृत्याविष्काराला टाळ्यांची दाद देत उपस्थित मान्यवरांसह ठाणेकरांनी या फ्लॅशमॉबवर धरलेला ठेका, असे स्वातंत्र्य दिनाचे उत्साही वातावरण पाहायला मिळाले, ते मंगळवारी कोरम मॉलमध्ये. लोकमतच्या पुढाकाराने, टॅन्ट्रम डान्स अकॅडमीच्या वतीने आणि कोरमच्या सहकार्याने हा आगळावेगळा फ्लॅश मॉब आयोजिण्यात आला होता.
या सोहळ्याला लोकमतचे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, लोकमत ठाणेचे सहायक सरव्यवस्थापक राघवेंद्र शेट, लोकमत ठाणेचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान, मिस वर्ल्ड नेक्स्ट टॉप मॉडेल २०१७ शेरील चार्ल्स, कोरम मॉलचे संतोष नायर, शंतनू जोशी, मिस अ‍ॅण्ड मिसेस टिआरा इंडियन आॅर्गनायझेशनच्या संस्थापक रेखा मिरजकर, क्रिएटिव्ह डायरेक्टर ऋषीकेश मिरजकर, टॅन्ट्रम डान्स अकॅडमीचे संस्थापक चंद्रकांत रायकर उपस्थित होते.
या वेळी शेरील चार्ल्स यांच्या हस्ते झेंडावंदन झाल्यावर बघताबघता कोरम मॉलच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी एकत्र जमले आणि क्षणार्धातच सब से आगे होंगे हिंदुस्थानी, रंग दे बसंती, कंधो से मिलते है कंधे, जय हो... अशा देशभक्तीपर गीतांवर त्यांनी उत्कृष्ट नृत्याविष्काराच्या माध्यमातून फ्लॅश मॉब सादर केला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या फ्लॅश मॉबमध्ये शेरील चार्ल्स यांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होत नृत्य केले. तसेच मुलांसोबत त्यांनी सेल्फीही काढला. या मॉबमध्ये न्यू इंग्लिश स्कूल- कळवा, पद्मावती व्यंकटेश हायस्कूल- कळवा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी इंग्लिश हायस्कूल- कोपरी, ज्ञानप्रसारणी स्कूल- कळवा, मिलाग्रीस इंग्लिश स्कूल-कळवा अशा पाच शाळांचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांबरोबर ज्येष्ठांनीही उपक्रमाचा आनंद लुटला. ध्वजारोहणाबरोबरच फ्लॅश मॉबचा हा उपक्रम अतिशय सुंदर आणि हटके ठरला, असे मत रेखा मिरजकर यांनी व्यक्त केले.
>स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजिलेला हा अतिशय स्तुत्य उपक्रम होता. देशप्रेम या थीमवर आधारित कोरम मॉलमध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम साजरा झाला आणि अशा उपक्रमांसाठी कोरम मॉल कायम लोकमतच्या सोबत असतो.
- संतोष नायर,
सेंटर हेड कोरम मॉल
>फ्लॅश मॉबसारख्या अनोख्या कार्यक्रमातून लोकमतने स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा केला आणि या ध्वजारोहणाचा मान मला मिळाला, हे माझे भाग्य आहे.
- शेरील चार्ल्स,
मिस वर्ल्ड नेक्स्ट टॉप मॉडेल
>नेहमीच्या कार्यक्रमांपेक्षाही हा वेगळा कार्यक्रम होता. ज्या माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत पोहोचता आले. या फ्लॅश मॉबमध्ये मुलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. विविध देशभक्तीपर गीतांवर मुलांनी उत्तम नृत्य सादर केले. मुलांच्या सहभागानेच या कार्यक्रमाला अधिक रंगत आली.
- चंद्रकात रायकर, टॅन्ट्रमचे सर्वेसर्वा

Web Title: Unique Freedom Flash Mob to Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.