स्वत:च्या कार्यातून ‘त्या’ शिक्षिकेचे सावित्रीबाईंना अनोखे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:16 AM2021-01-03T01:16:47+5:302021-01-03T01:16:54+5:30
महिला शिक्षण दिन विशेष
स्नेहा पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घरात एक स्त्री शिक्षिका असली की, ती संपूर्ण घर कसे शिक्षित आणि सुसंस्कारित करते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भिवंडीच्या लामज येथे राहणाऱ्या आणि ठाणे जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका शकुंतला सोनावणे. डीएड असूनही बेरोजगार असणाऱ्या आपल्या पतीला संसारापासून ते नोकरी मिळणे या सगळ्यात त्यांनी साथ दिली. तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. इतकेच नव्हे, या सावित्रीच्या दोन सुना शिक्षिका असून, एक डॉक्टर आहे, तर दोघींपैकी एका सुनेने लग्नानंतर ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणविषयक विचार व शैक्षणिक योगदानाचा अभ्यास’ हा विषय घेऊन संशोधन पूर्ण केले आहे. स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या कार्यातून घडलेल्या शकुंतला सोनावणे यांचे कार्यही आधुनिक काळातीच सावित्रींच्या लेकींसाठी प्रेरणादायी आहे.
शकुंतला सोनवणे या जुनी ११वी उत्तीर्ण. १९७२ साली सुभाष सोनावणे यांच्याशी लग्न झाले. सासरी गरिबी तर होतीच, पण डी.एड असूनही पती सुभाष बेरोजगार होते. शकुंतला स्वत:ही सुशिक्षित होत्या. मात्र, भविष्याचे काय, या विचाराने त्या सतत अस्वस्थ असायच्या. पती शेतीत रमले होते. मात्र, शकुंतला नोकरीसाठी शोधाशोध करायच्या.
त्याच वेळी गावात कोणीतरी आणलेल्या वर्तमानपत्रात ठाणे जिल्ह्यात शिक्षक भरती असल्याचे समजले आणि त्या बातमीने पुढे सुरू झाला शकुंतला यांचा सावित्रीच्या कार्याला सार्थ ठरावा असा प्रवास. पती सुभाष यांना ७५ साली भिवंडीत शिक्षकाची नोकरी मिळाली, पण स्वत:लाही नोकरीसाठी त्यांची धडपड सुरू होती. आग्रहाने पत्रद्वारा प्रशिक्षण योजना या शासनाच्या शिक्षण व्यवस्थेमार्फत शकुंतला यांनी परेल येथील शिरोडकर अध्यापक महाविद्यालयात आपले दोन वर्षांचे डी.एड प्रशिक्षण पूर्ण केले. वाहतुकीच्या मर्यादित सुविधा असूनही लामज ते परेल असा कष्टप्रद प्रवास करत, त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि मग त्यांना नोकरी मिळाली. घरात तीनही मुलांना त्यांनी उच्चशिक्षित केले. जशी मुले तशाच तीनही सुना उच्चशिक्षित असाव्यात, असा त्यांचा मनोदय होता.