ठाण्यात नाल्यातील सफाई करुन फुलेनगरच्या तरुणांनी केले अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:40 PM2018-02-14T22:40:07+5:302018-02-14T22:59:59+5:30
एकीकडे स्वच्छता अभियान राबविणा-या ठाणे महापालिकेने परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने फुलेनगरच्या तरुणांनी पुढाकार घेऊन नाल्यात उतरुन सफाईची मोहीम राबवून आगळेवगळे आंदोलन केले.
ठाणे: संत ज्ञानेश्वरनगर आणि महात्मा फुलेनगरात गेल्या काही दिवसांपासून मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे रोगराई पसरु नये म्हणून स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत थेट नाल्यातील सफाई करुन मंगळवारी एक अनोखे आंदोलन केले.
संत ज्ञानेश्वरनगर आणि महात्मा फुलेनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या घंटागाडीची अनियमितता सुरु आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे तक्र ारी करूनही याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे येथील नागरिकांनी येथील जवळच असलेल्या वाहत्या नाल्यात गेल्या काही दिवसांपासून कचरा टाकणे सुरु केले. त्यामुळे येथे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी आणि रोगराई पसरत होती. येथून शाळेत जाणा-या विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांना या घाणीचा सामना करावा लागत होता. पालिकेने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे याठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी स्थानिक तरुणांनी पुढाकार घेतला. विपुल नवले, निलेश मोरे, स्विप्नल फर्डे, कैलास हरड, राजू वेंगुर्लेकर, महेश हरड, निलेश, जितु, म्हैसू, गणेश, अनिकेत गगे या तरु णांनी नाल्यात उतरुन साफसफाई केली. काही प्रमाणात हा नाला साफ झाल्याचे चित्र असले तरी आणखी व्यापक सफाई पालिका प्रशासनाने राबवावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.