ठाणे-भिवंडीतील महाविद्यालयात पोलिसांचा अनोखा उपक्रम
By जितेंद्र कालेकर | Published: December 19, 2018 08:24 PM2018-12-19T20:24:32+5:302018-12-19T20:59:03+5:30
ऐन तारुण्यामध्ये मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांच्यावर दुष्परिणाम होण्याची भीती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आपले मानसिक आणि शारिरिक आरोग्य चांगले ठेवावे, असा सल्ला ठाणे पोलिसांनी महाविद्यालयातील अमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीमेमध्ये दिला आहे.
ठाणे : अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जागृती तरुण तरुणींमध्ये होण्यासाठी ठाणे पोलिसांतर्फे सध्या विेशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात पोलिसांनी अमली पदार्थांमुळे होणा-या दुष्परिणांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या संकल्पनेतून सध्या ठाणे आयुक्तालयातील विविध महाविद्यालयांमध्ये ही मोहीम राबविली जात आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य मराठे यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, उपनिरीक्षक कल्याणी पाटील आणि हवालदार काळूराम शिरोसे यांनी अमली पदार्थांमुळे मानवी शरिरावर होणारे परिणाम विशद केले. एखादी व्यक्ती कोणत्याही अमली पदार्थांच्या आहारी गेल्यानंतर त्याला केवळ ताकद आल्याचा भास होतो. पण यात त्याचे संपूर्ण शरीर पोखरले जाते. नेहमीच तो निद्रेच्या आहारी जातो. वारंवार त्याला नशा करावी वाटते. नशेसाठी गांजा, दारू, इफे ड्रिन असे अमली पदार्थ मिळविण्यासाठी प्रसंगी तो अगदी स्वत:च्या घरातही चो-या करू लागतो. आरोग्य घातक होण्याबरोबर आर्थिक आणि मानसिक परिणामांनाही त्याला सामोरे जावे लागते. अशावेळी पालकांचे विद्यार्थ्यांशी नाते कसे असावे? याबाबतही या पथकाने विद्यार्थ्यांना उद्धबोधन केले. सुमारे २५० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला.
भिवंडीच्या चौगुले महाविद्यालयातही १९ डिसेंबर रोजी अमली पदार्थांच्या सेवनाने होणा-या दुष्परिणांमाबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा, पोस्टर पेंटींग, स्लोगन, वक्तृत्व आणि समूहनृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. सहायक पोलीस आयुक्त किसन गावीत, साईसेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महादेव चौगुले, प्राचार्य डॉ. गायकवाड आणि नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते. सुमारे १०० विद्यार्थ्यांनी येथील स्पर्धेत सहभाग नोंदविला. पहिल्या तीन क्रमांकाचे बक्षिस मिळविणाºया विद्यार्थ्यांचा विशेष गौरवही करण्यात आला. यावेळी पालकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.