"उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा"; भिवंडी प्रांताधिकाऱ्यांची मतदार नोंदणीसाठी अनोखी जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 05:58 PM2021-09-14T17:58:27+5:302021-09-14T18:01:26+5:30
Bhiwandi News : महसूल व निवडणूक विभागाकडून शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार नोंदणी करणे गरजेचे आहे.
नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडीत मतदार नोंदणी कार्यक्रम निवडणूक तसेच महसूल विभागाने हाती घेतला आहे. सध्या कोरोना संकट थोडेफार आटोक्यात असल्याने शासकीय नियमांचे पालन करून ठिकठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने भिवंडी महसूल विभागाकडून '' उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा'' अशी अनोखी मतदार जनजागृती मोहीम भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी शहरात राबविली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव व धार्मिक स्थळांबरोबरच ज्या ज्या ठिकणी नागरिकांचे रोजचे येणे जाणे आहे अशा ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी ही जनजागृती मोहीम राबविली असून ठिकठिकाणी मतदार नोंदणी जनजागृतीचे बॅनर लावण्यात आले आहेत.
भिवंडीत आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय मोर्चे बांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे महसूल व निवडणूक विभागाकडून शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र अनेक वेळा नागरिकांना मतदार नोंदणी करताना अनेक अडचणी येत असतात त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडतो ज्याचा फायदा काही राजकीय पुढारी तर कधी मतदार यादीत नाव चढविण्यासाठी दलाल आर्थिक व्यवहार करून मतदारांकडून पैसे उकळण्याचे प्रकार घडत असतात. या सर्व अवैध प्रकारांना आळा बसावा व जास्तीत जास्त नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपले मतदार यादीत नाव नोंदविणे शक्य व्हावे म्हणून भिवंडी प्रांताधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकणी ''उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा" अशी अनोखी मतदार जनजागृती मोहीम भिवंडीत सुरू केली असून या मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून नागरिकांना किचकट वाटणारी मतदान नोंदणी या मोहिमेतून सुलभ होणार असल्याची भावना दक्ष भिवंडीकर व्यक्त करीत आहेत.
दरम्यान ही संकल्पना मुंबईत केलेल्या जनजागृतीच्या संकल्पनेतून भिवंडीत राबविली जात असून कोरोना काळात मतदार जनजागृती करता आली नाही. त्यामुळे आता सार्वजनिक गणेश मंडळ, धार्मिक स्थळे, मार्केट व जिथे नागरिक जास्त ये जा करतात अशा सर्वच ठिकाणी ' उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा' ही जनजागृती मोहीम राबवली जात असून तसे बॅनर ठिकठिकाणी लावले असून त्यामुळे लोकांमध्ये निश्चितच जनजागृती होईल व मतदार नोंदणीसाठी जास्तीत जास्त नागरिक स्वतः पुढाकार घेतील अशी प्रतिक्रिया भिवंडीचे प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी लोकमतला दिली आहे.