आमराईतील आंब्यांसाठी अनोखा नियम; रोजगारावर तोडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 12:22 AM2019-06-16T00:22:30+5:302019-06-16T00:22:53+5:30
एका अलिखित नियमाने सर्वांनाच विचार करायला लावणारी नियमावली शहापूर तालुक्यातील खेडेगावात पाहयला मिळत आहे तीही रोजगाराच्या बाबतीत.
- जनार्दन भेरे
भातसानगर : आज घटनेने प्रत्येकाला अधिकार मिळवून दिले आहेत. त्यातही त्याच्या पलीकडे जाऊन काही अधिकार हे सर्वांनी एकत्र बसून ठरवले आणि त्याची अंमलबजावणी केली तर माणसाचे जीवन नक्कीच सुधारण्यास वेळ लागणार नाही. अशाच एका अलिखित नियमाने सर्वांनाच विचार करायला लावणारी नियमावली शहापूर तालुक्यातील खेडेगावात पाहयला मिळत आहे तीही रोजगाराच्या बाबतीत.
तालुक्यातील चिल्लारवाडी,तळवाडे, रोठा, कातकरी वाडी या आदिवासी व कुणबी बहुल लोकसंख्या असलेल्या वाड्या. या गाव व वाड्यांच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आमराई असून ती आंब्यांनी बहरली आहे. या आमराईच्या बाबतीत येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक अलिखित नियम तयार केला आहे तो असा की, या आमराईतील आंबे कुणीही पाडायचे नाहीत. मग ते दगडाने वा चढून. केवळ पडलेले आंबे जमा करायचे आणि बाजारात विक्र ीसाठी न्यायचे व रोजगार मिळवायचा. त्यामुळे अनेकांना मोठा रोजगार मिळत आहे. कुठलेही रसायन न वापरता नैसर्गिक पद्धतीने पिकलेला हा आंबा असल्याने त्याला बाजारातही मागणी असल्याने अनेकांना चांगला रोजगार मिळत आहे.
यासाठी ग्रामस्थांनी एक अलिखित असा नियम तयार केला आहे. आंबे कुणी पाडायचे नाहीत, कुणी चढून पाडल्यास दोन हजार रु पये दंड. दगडाने पाडल्यास पाचशे रु पये दंड आकारण्यात येतो.
गावांच्या बाजूला असणाऱ्या आमराईत नियम लावल्याने सर्वांना आंबे मिळतात. त्यामुळे आम्हाला चांगले चार पैसे मिळतात, समाधान वाटते. - शालूबाई वाघ, ग्रामस्थ
ज्या गावपाड्यांच्या परिसरात आमराई आहेत त्याठिकाणी असे नियम असल्यास त्याचा चांगला फायदा सर्वांना होतो.
- रमेश कैवारी, माजी उपसरपंच, मुरबीचा पाडा