पंपांवरील युनिटला सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:01 AM2017-07-21T02:01:33+5:302017-07-21T02:01:33+5:30
पल्सर आणि सेन्सरकार्डच्या आधारे पेट्रोलपंपाच्या युनिटमधून ग्राहकांना कमी पेट्रोल देऊन त्यांची लूट करणाऱ्या १७ जिल्ह्यांतील ११८ पंपांवर ठाणे गुन्हे अन्वेषण
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पल्सर आणि सेन्सरकार्डच्या आधारे पेट्रोलपंपाच्या युनिटमधून ग्राहकांना कमी पेट्रोल देऊन त्यांची लूट करणाऱ्या १७ जिल्ह्यांतील ११८ पंपांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे. आतापर्यंतच्या कारवाईत त्यातील ६९ पंपांवरील ६९ युनिटला सील ठोकल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.
राज्यभरातील पेट्रोलपंप घोटाळ्यातील आतापर्यंतच्या माहितीचा तपशील त्रिमुखे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी ठाण्यात- ३३, रायगड- ७, अमरावती- १, पालघर-४, मुंबई- २, नाशिक- १२, सातारा- ६, पुणे- १६, औरंगाबाद- ८, तर यवतमाळ, रत्नागिरी, चंद्रपूर, जळगावमधील प्रत्येकी दोन पंप, सांगली- ७,
नागपूर १४ अशा ११८ पैकी ६९
पंपांवर यशस्वी कारवाई झाली आहे. यातील बहुतांश पंपांमध्ये पाच लीटरमागे ५०, १०० आणि २०० मिलिलीटर पेट्रोल कमी देण्यात येत असल्याचे आढळले. यात आयओसीएल- ६३, एचपीसीएल- ३९, बीपीसीएल- ११ आणि एस्सारच्या पाच पंपांवर कारवाई, तपासणी केली.
सूत्रधार मुलकरच्या ४० परदेश वाऱ्या
या संपूर्ण पेट्रोलपंप घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार प्रकाश मुलकर याने परदेशातील पंपांवर इलेक्ट्रॉनिक चिप्सची विक्री करण्यासाठी आतापर्यंत थायलंडमध्ये ५ वेळा, चीन ४, मलेशिया- २, केनिया- १ अशा २५ देशांमध्ये एकूण ४० वेळा तो फिरून आल्याचे उघड झाले आहे. त्याने आणखीही कोणत्या देशांमध्ये या हेराफेरीच्या सामग्रीची विक्री केली आहे किंवा कसे, याबाबतचा तपास सुरू असल्याचे त्रिमुखे यांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली आहे.