विद्यापीठात निवडणुकांची लगबग सुरू
By Admin | Published: June 20, 2017 05:37 AM2017-06-20T05:37:40+5:302017-06-20T05:37:40+5:30
मुंबईसह राज्यातील विद्यापीठांमध्ये सध्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विद्यापीठ कायदा पारित झाल्यानंतर विद्यापीठात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यातील विद्यापीठांमध्ये सध्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विद्यापीठ कायदा पारित झाल्यानंतर विद्यापीठात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा असलेल्या पदवीधरांच्या नावनोंदणीच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. यंदा मुंबई विद्यापीठाने ही नावनोंदणी आॅनलाइन पद्धतीने सुरू केली असली तरी अनेक जण यावर नाराज आहेत.
विद्यापीठात २३ वर्षांनी निवडणुका होत आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून विद्यार्थी संघटना सक्रिय झाल्या आहेत. पदवीधरांना या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा हक्क असतो. पण, त्याआधी नावनोंदणी असणे आवश्यक असते. ३० जूनपर्यंत नावनोंदणी झालेल्या व्यक्तींनाच मतदानाचा हक्क मिळणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातून पदवीधर झालेल्यांचा शोध घेऊन नावनोंदणीला वेग प्राप्त झाला आहे.
आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हरचा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना पदवीधरांकडून अर्ज भरून घेत आहेत. सोशल मीडियावरून निवडणुकांविषयी जनजागृती केली जात आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रदेश मंत्री प्रमोद कऱ्हाडे यांनी सांगितले की, विद्यापीठ निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास दिरंगाई करत आहे. ठरावीक अधिकारी ही प्रक्रिया पाहात आहेत. पण, आता लवकरच निवडणुका होण्याची गरज आहे.
माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी सांगितले, ३० जूनपर्यंत पदवीधरांची नावनोंदणी करणे तसे अवघड आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. पण, आॅगस्ट महिन्यात सिनेट बसवायची असल्यामुळे नावनोंदणीची मुदतवाढ मिळणार नाही. सध्या अन्य प्रवेशांची प्रक्रिया सुरू आहे, त्यात पालक, विद्यार्थी व्यस्त आहेत. पण, मुदतवाढ मिळणार नसल्याने आता अडचणींवर मात करून प्रक्रिया सुरू आहे.