मुस्लिमांची माफी मागण्याचे आव्हान देत अज्ञाताकडून ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 10:42 AM2022-06-14T10:42:17+5:302022-06-14T10:47:34+5:30
या घटनेनंतर सायबर पोलिसांनी या हॅकर्सचा शोध सुरू केला आहे.
ठाणे: जगभराच्या मुस्लिमांची माफी मागा असे आव्हान देत एका हॅकर टीम ने थेट ठाणे शहर पोलिसांचे संकेतस्थळ हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी समोर आला आहे. या प्रकारामुळे ठाणे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवारी सकाळी ८.३० ते ९ वाजण्याच्या सुमारास ठाणे शहर पोलिसांच्या सायबर सेल विभागा च्या सोशल मीडिया युनिटचे काही कर्मचारी नेहमीप्रमाणे ठाणे पोलिसांच्या कामगिरीचे फोटो अपलोड करण्यासाठी गेले. त्यावेळी वन बॅट सायबर टीम- इंडोनेशियन डिफेसर “ असा या हॅकर टीमचा उल्लेख होता. या घटनेनंतर सायबर पोलिसांनी या हॅकर्सचा शोध सुरू केला आहे.
ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ हॅक केल्याचे वृत्त खरे असले तरी ते कोणी आणि का केले याचा शोध घेण्यात येत असल्याचे सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलम वाव्हळ यांनी लोकमत ला सांगितले. जगभरातील मुस्लिमांची माफी मागण्याचे आव्हानही यात केले होते. संकेतस्थळ पुनर्जीवित केल्यानंतर मात्र हा संदेश नष्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सदर संकेतस्थळ पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्यासाठी सायबर तज्ञांची मदत घेतली जात आहे. सायबर सह गुन्हे अन्वेषण विभागाच्या वेगवेगळ्या पथकांकडून हॅकरचा शोध घेतला जात आहे. हॅकर्स ग्रुपने ठाणे पोलिसांचेच संकेतस्थळ कोणत्या उद्देशाने हॅक केले हा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.