आॅनलाइन दत्तक गेलेल्या मुलांची ‘अनाथालयवापसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 06:42 AM2018-04-03T06:42:48+5:302018-04-03T06:42:48+5:30

केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी हटवादीपणा करून आॅनलाइन पद्धतीने मुले दत्तक देण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी अमलात आणल्याने पालकांचे समुपदेशन योग्य पद्धतीने न झाल्याने दत्तक घेतलेली मुले अनाथालयांकडे परत येण्याचे प्रमाण वाढले आहे.

'Unlawful Conversation' of Children Who Have Adopted Online | आॅनलाइन दत्तक गेलेल्या मुलांची ‘अनाथालयवापसी’

आॅनलाइन दत्तक गेलेल्या मुलांची ‘अनाथालयवापसी’

Next

- जान्हवी मोर्ये
डोंबिवली - केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी हटवादीपणा करून आॅनलाइन पद्धतीने मुले दत्तक देण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी अमलात आणल्याने पालकांचे समुपदेशन योग्य पद्धतीने न झाल्याने दत्तक घेतलेली मुले अनाथालयांकडे परत येण्याचे प्रमाण वाढले आहे. डोंबिवलीत गेली २५ वर्षे अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या जननी आशीष संस्थेच्या संचालकांनी हा धक्कादायक अनुभव कथन केला.
२०१५ पासून आॅनलाइन पद्धतीने मुले दत्तक देण्याची पद्धत गांधी यांनी सुरू केली. या पद्धतीमुळे पालकांचे समुपदेशन होत नाही. यामुळे दत्तक दिलेली मुले नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. पालक देशातील कोणत्याही संस्थेतील बालक दत्तक घेतात. या पालकांचे समुपदेशन होत नसल्याने दत्तक दिलेले मूल नाकारले जाते. मूल दत्तक देण्याचा मजबूत पाया समुपदेशन असल्याने व तेच योग्य पद्धतीने होत नाही. पालकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे मध्येच ते मूल परत संस्थेत पाठवले जाते. अशा घटना वाढत असल्याची खंत संस्थेच्या समुपदेशक जयश्री देशपांडे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिली.
आॅफलाइन पद्धतीने मुले दत्तक घेण्याचा काही मार्ग आहे का, अशी विचारणा पालकांकडून केली जाते. मात्र, वेटिंग लिस्ट पाहिल्यावर मुले दत्तक घेण्याच्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. त्यामुळे मुले आॅफलाइन पद्धतीने पालकांपर्यंत पोहोचत असण्याची दाट शक्यता आहे. हे शोधून काढण्याचे काम यंत्रणेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
जिमखान्यासमोरच गेली २५ वर्षे अनाथ मुलांचे संगोपन करण्याचे काम जननी आशीष संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. संस्थेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. २५ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने ४६५ बालकांचे पुनर्वसन केले. डॉ. कीर्तिदा प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था स्थापन झाली. संस्थेला ० ते ६ या वयोगटांतील २५ बालकांचे संगोपन करण्याची परवानगी असली, तरी सध्या ५० बालके संस्थेत आहेत. कुमारी मातांनी बाळ संस्थेत सोडल्यानंतर ६० दिवसांची मुदत दिली जाते. या कालावधीत बालकल्याण समितीच्या परवानगीने ते मूल परत नेता येते. मात्र, अशा बालकांना चांगल्या ठिकाणी देण्याचे आमिष दाखवून मुले विक्रीचे प्रमाण वाढत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. अपंग, मतिमंद, अंध बालकांचे पुनर्वसन हा मोठा प्रश्न आहे. अशा मुलांसाठी काम करणाºया स्वतंत्र संस्था असूनही त्यांना तेथे पाठवले जाते. सध्या बोल्ड झाल्याने कुमारी माता मुलांची जबाबदारी स्वीकारत आहेत. बाळ अनाथाश्रमात सोडले जाते व पुन्हा परत नेले जाते.

पहिली दत्तक मुलगी रमली संसारात
संस्था चालवताना गेल्या २५ वर्षांत अनेक चांगलेवाईट अनुभव आले आहेत. सरकारने आम्हाला कायमस्वरूपी विनाअनुदानित या तत्त्वावर संस्था चालवायला परवानगी दिली असल्याने अनुदान मिळत नाही. त्यामुळे मुलांचा वैद्यकीय खर्च आणि शिक्षण ही आमच्यापुढे मोठी आव्हाने आहेत. बाळ कमी वजनाचे असणे, अचानक येणारे आजारपण यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. नर्सरी ते सीनिअर केजीपर्यंतचे शिक्षण मुलांना संस्थेत शिक्षक ठेवून देण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. संस्थेतून दत्तक गेलेल्या पहिल्या मुलीचे आज लग्न होऊन ती संसारात रमली आहे. ही खूप आनंदाची बाब आहे.

दत्तक प्रक्रियेत बदल गरजेचा - श्रीकांत शिंदे

मुले दत्तक घेण्याची प्रक्रिया चार वर्षांपासून आॅनलाइन केल्याने मूल दत्तक घेतलेल्या पालकांची योग्य प्रकारे माहिती होत नाही. परिणामी, पालक व मुले यांच्यात दुरावा निर्माण होत असल्याने काही मुले संस्थेत येऊ लागली आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असून मूल दत्तक देण्याच्या पद्धतीत बदल करण्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवणार असल्याचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

‘जननी आशीष’ च्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, २५ वर्षांपूर्वी २१ महिलांनी ही संस्था सुरू करण्याचे धाडस केले. समाजाचे देणे लागतो, असे केवळ न बोलता त्यांनी अनाथ मुलांचे संगोपन केले. ४६० मुलांना पालक दिले.

चार वर्षांपूर्वी नवा कायदा आला व मुले आॅनलाइन पद्धतीमुळे देशात कोठेही दत्तक जाऊ लागली. पूर्वी मूल दत्तक घेताना पालकांची चौकशी होत होती. त्यांच्याशी चर्चा होत होती. आॅनलाइन पद्धतीमुळे ती बंद झाली. काही दिवसांत पुन्हा संस्थेत येऊ लागली आहेत. त्यामुळे कायद्यात बदल करण्यावर त्यांनी भर दिला.

Web Title: 'Unlawful Conversation' of Children Who Have Adopted Online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.