उल्हासनगर महापालिका समाजमंदिरात विनापरवाना व्यायामशाळा, शिवसेना पदाधिकाऱ्याचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 07:33 PM2022-06-09T19:33:37+5:302022-06-09T19:33:49+5:30
उपशहरप्रमुख व माजी नगरसेवक दिलीप गायकवाड यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ६ जून रोजी समाजमंदिरात व्यायामशाळा सुरू केली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका समाजमंदिर मध्ये जन्मदिवसाचे औचित्य साधून विनापरवाना व्यायामशाळा सुरू केल्याचा आरोप मनसेने केल्याने एकच खळबळ उडाली. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी याबाबत मालमत्ता विभागाचे व्यवस्थापक यांना चौकशी करण्याचे आदेश दिले.
उल्हासनगर कॅम्प नं-१ शिवनेरीनगर परिसरात महापालिकेचे समाजमंदिर आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता शिवसेनेचे उपशहरप्रमुख व माजी नगरसेवक दिलीप गायकवाड यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ६ जून रोजी समाजमंदिरात व्यायामशाळा सुरू केली. व्यायाम शाळेचे उदघाटन शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यांच्या हस्ते जल्लोषात झाला. महापालिका समाजमंदिरात विनापरवाना व्यायामशाळा सुरू केल्याचा आरोप मनसेचे मैंनुद्दीन शेख यांनी करून तशी तक्रार महापालिकेकडे केली. याप्रकारने महापालिका मालमत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कारवाईची मागणी होत आहे.
महापालिका समाजमंदिरात विनापरवाना आधारकार्ड बनविण्याचे शिबिर लावल्या प्रकरणी पवार या व्यक्तीवर यापूर्वी महापालिकेने गुन्हा दाखल केला होता. याची आठवण मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी महापालिका आयुक्त यांना करून दिली. याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक व उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नागरिकांसाठी व्यायामशाळा सुरू केली. हे चुकीचे केले काय. असा उलट प्रश्न केला आहे. महापालिका समाजमंदिर माजी नगरसेवक व सामाजिक संस्थेच्या ताब्यात असल्याचा आरोप होत असून याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे. तर समाजमंदिर बाबत तक्रारी आल्या असून याबाबत चौकाशी करण्याचे आदेश मालमत्ता व्यवस्थापक यांना दिले. अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.