Unlock: दुकानांना एक तर हॉटेल, रेस्टॉरंटना वेगळे नियम का?; अपेक्षित व्यवसाय होत नसल्यानं नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:25 AM2020-10-12T00:25:01+5:302020-10-12T06:53:24+5:30
दुकानांची वेळ वाढवा, अनलॉक झाल्यावर ठाण्यात सर्व दुकाने, शोरूम सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली.
स्नेहा पावसकर
ठाणे : अनलॉक झाल्यावर ठाण्यात सर्व दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, तरीही अपेक्षित फायदा होत नाही. आम्हाला दुकाने रात्री ९.३० ते १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. एकीकडे हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री ११ पर्यंत शहरात परवानगी दिली असताना आम्हा दुकानदार, व्यापाऱ्यांना वेगळा न्याय का, असा सवाल दुकानदारवर्गातून विचारला जात आहे.
अनलॉक झाल्यावर ठाण्यात सर्व दुकाने, शोरूम सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. मात्र, कमी वेळात अपेक्षित व्यवसाय होत नसून गेल्या अनेक महिन्यांत आमचे नुकसान झाले आहे. त्यातच सामान्य माणसाला खरेदी करण्यासाठी दुकाने अधिक वेळ खुली ठेवली, तर सोयीचे ठरू शकते. जर हॉटेल, बारना परवानगी मिळू शकते, तर मग दुकानदारांनाही रात्री ९.३०-१० पर्यंत वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी होत आहे.
वेळ वाढवण्याबाबत ठामपाने निर्णय घ्यावा
व्यापारी, दुकानदारांना एक न्याय आणि हॉटेलना दुसरा न्याय, हे चुकीचे आहे. दुकाने सुरू ठेवण्याबाबत, त्यांना वेळ वाढवून देण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी स्वराज इंडिया ठाणे जिल्ह्याच्या वतीने ठाणे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
रात्री ९ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्या - केळकर
एकीकडे बार, हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री ११.३० पर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी महापालिकेने दिली आहे. मात्र, व्यापारी-दुकानदार आणि आस्थापनांना सायंकाळी ७ पर्यंतची वेळ दिल्याने व्यापारीवर्गावर आर्थिक संकट कोसळले आहे. ही दुकाने किमान रात्री ९ पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहक साधारणपणे ५ ते ९ च्या दरम्यान येतात. मात्र, आता ७ वाजता दुकाने बंद होऊ लागल्याने ६ ते ७ च्या दरम्यान बाजारात गर्दी होते. यातून संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीचे दिवस जवळ आल्याने ग्राहक छोटीमोठी खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि व्यापाऱ्यांचा विचार करता वेळ वाढवावी. - आशीष शिरसाठ,
वरिष्ठ उपाध्यक्ष, ठाणे व्यापारी महासंघ