अवजड वाहने चोरून ती बनावट कागद्पत्रांनी विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक करून पावणे पाच कोटींची ५३ वाहने जप्त 

By धीरज परब | Published: March 3, 2023 05:04 PM2023-03-03T17:04:13+5:302023-03-03T17:04:24+5:30

अवजड वाहने चोरून त्यांचे चेसिस व इंजिन क्रमांक खोडत बनावट कागदपत्रांद्वारे विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचे २२ गुन्हे उघडकीस आणत मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा १ ने पावणे पाच कोटींची ५३ वाहने जप्त केली आहेत .

Unmasking of an interstate gang that steals heavy vehicles and sells them with fake documents; After arresting the two, 53 vehicles worth 4 crores were seized | अवजड वाहने चोरून ती बनावट कागद्पत्रांनी विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक करून पावणे पाच कोटींची ५३ वाहने जप्त 

अवजड वाहने चोरून ती बनावट कागद्पत्रांनी विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक करून पावणे पाच कोटींची ५३ वाहने जप्त 

googlenewsNext

मीरारोड -

अवजड वाहने चोरून त्यांचे चेसिस व इंजिन क्रमांक खोडत बनावट कागदपत्रांद्वारे विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचे २२ गुन्हे उघडकीस आणत मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा १ ने पावणे पाच कोटींची ५३ वाहने जप्त केली आहेत. या टोळीच्या म्होरक्यासह दोघांना अटक केली असून आणखी काही आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी दिली. 

काशीमीराच्या सिद्धिविनायक नगर मधील रोझ गार्डन मध्ये राहणारे विनयकुमार पाल यांचा टेम्पो त्यांच्या घरा समोरील रस्त्यावरून गेल्यावर्षी डिसेम्बर मध्ये चोरीला गेला होता .  काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे, कैलास टोकले व सुहास कांबळे आणि पथकाने तपास सुरु केला . 

 

पोलिसांनी चोरीचा टेम्पो शोधण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील टोलनाक्यांचे सीसीटीव्ही तपासण्यास सुरवात केली . महाराष्ट्र , गुजरात महामार्गावरील टोलनाक्यांचे सीसीटीव्ही फुटेज द्वारे शोध घेत घेत थेट राजस्थानच्या पाटोडी टोलनाका पर्यंत पोहचले . 

 

त्यावेळी तिचा क्रमांक बदलून गुजरातचा झालेला होता तसेच गाडीवर काहीसा बदल केलेला होता . मात्र फास्टटॅग व गाडी वरील काही खुणां मुळे ती काशीमीरा वरून चोरलेली तीच गाडी असल्याचे पोलिसांनी हेरले . तेथूनच ती गाडी पुन्हा गुजरातच्या अहमदाबाद दिशेने आली . नंतर त्या फास्टटॅगचा संपर्क क्रमांक हा फारुख तैय्यब खान ( वय ३६ वर्षे ) रा. फखरुद्दीनका, पो. टपुग्रा, ता. टिजारा, जि. अलवार, राजस्थान याचा असल्याने पोलिसांनी त्याला पकडले . सोबत त्याचा साथीदार मुबिन हारिस खान ( वय ४० वर्षे ) याला अटक केली.  

फारूक हा म्होरक्या असून दोघेही आरोपी वाहन चालक आहेत व एकाच भागातले आहेत. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी करायला सुरवात केली असता त्यांनी चोरलेली ४८ आयशर टेम्पो,  २ टाटा टेम्पो, १ अशोक लेलॅण्ड टेम्पो व २ क्रेटा कार अशी तब्बल ५३  वाहने गुजरात , राजस्थान , हरियाणा भागातून जप्त केली . त्या भागातील आणखी १२ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 

महाराष्ट्र, हरियाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली आदी राज्यातून त्यांनी हि वाहने चोरलेली असून ह्या राज्यातील वाहन चोरीचे २०१७ पासून २०२२ साला पर्यंतचे २२ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत . सदर वाहने चोरी करुन त्यावरील मुळ इंजिन व चेसिस नंबर खोडून त्यावर बनावट तयार केलेल्या कागदपत्रांप्रमाणेचे इंजिन व चेसिस

नंबर टाकण्यात आले . नंतर विविध आर. टी. ओ. विभागात त्याची पुनर्नोदणी केल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलीस आयुक्त पांडेय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . 

 

फारूक व टोळी  चोरीच्या गाड्या निम्म्या वा कमी किमतीत विकत होते . त्यांनी सदर गाड्या विक्रीतून गोळा केलेल्या पैश्यांचा वापर कुठे केला याचा शोध घेतला जात आहे . बनावट कागदपत्रे बनवण्यात कोण कोण गुंतले आहे त्याचा तपास सुरु आहे . 

 

ईशान्य भारतात अवजड वाहनांचे आयुष्य १० वर्षा पर्यंतचे असल्याने तेथील भंगारात निघालेल्या वा दुर्घटना ग्रस्त गाड्यांचे चेसिस आणि इंजिन क्रमांक चोरीच्या गाडयांना वापरून त्यांची गुजरात , राजस्थान आदी भागात नोंदणी करून घेतल्याचे उघडकीस आले आहे . तपासात आणखी चोरीच्या गाड्या सापडण्याची शक्यता आहे . जप्त ५३ वाहनां पैकी २२ गुन्हे उघडकीस आले असून अन्य वाहनांच्या मूळ मालकांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी आयशर कंपनीतील तज्ज्ञांचे सहकार्य घेतले आहे. 

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी राजू तांबे , संदीप शिंदे , किशोर वाडिले , संजय पाटील , संतोष चव्हाण , अविनाश गर्जे , संजय शिंदे , संतोष लांडगे , पुष्पेंद्र थापा ,  सचिन सावंत , प्रफुल्ल पाटील , विकास राजपूत , समीर यादव , प्रशांत विसपुते , सनी सूर्यवंशी ह्या गुन्हे शाखेच्या पथकासह राजस्थान व गुजरात पोलिसांनी देखील तपासात महत्वाचे सहकार्य केले .  अटक केलेले आरोपी हे आता गुन्हे घडलेल्या पोलीस ठाण्यांच्या ताब्यात दिले आहेत . 

Web Title: Unmasking of an interstate gang that steals heavy vehicles and sells them with fake documents; After arresting the two, 53 vehicles worth 4 crores were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.