उपचारांअभावी रुग्णांचे नाहक बळी, मृत्युचे प्रमाण वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:50 PM2020-06-09T23:50:51+5:302020-06-09T23:51:41+5:30
वेळेत उपचार न मिळाल्याने माजी उपनगराध्यक्षांचा मृत्यू
रुग्णवाहिकेअभावी कोरोनाबाधित रुग्णांचे बळी सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात गेले. अद्यापही कमीअधिक प्रमाणात हे प्रकार सुरूच असून, यात उपचाराअभावी रुग्णांनी जीव सोडल्याच्या धक्कादायक घटनांचीही भर पडत आहे. अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षांचा सोमवारी याच कारणांमुळे बळी गेला. याच शहरात आणखी एका वृद्धाचे उपचारासाठी अतोनात हाल झाले. श्वसनाचा त्रास होत असलेल्या या वृद्धास कोरोनाची लागण झाल्याचे समजून रुग्णालयांनी उपचार नाकारले. साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध न झाल्याने या वृद्धाचा मृत्यू ओढवला. उपचारांअभावी वाढत असलेले मृत्यू चिंतेची बाब आहे.
वेळेत उपचार न मिळाल्याने माजी उपनगराध्यक्षांचा मृत्यू
बदलापूर : अंबरनाथचे पहिले उपनगराध्यक्ष प्रदीप खानविलकर यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांची कोरोना चाचणीही केली होती. मात्र अहवाल न आल्याने त्यांच्यावर उपचार करण्यास विलंब झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला. हा प्रकार सोमवारी रात्री बदलापूरमध्ये घडला.
नगरपालिकेची पुनर्स्थापना झाल्यावर पहिले उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. सोमवारी दिवसभर खानविलकर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. एका खासगी रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर ते बदलापूरला गेले. सायंकाळी पुन्हा त्यांना त्रास जाणवल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते; मात्र कोरोनाचा अहवाल नसल्याने कोणतेच रुग्णालय दाखल करून घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे घरी मृत्यू झाला. कोरोनाचा अहवाल नसल्याने त्यांना घरीच आराम करण्याचा सल्ला देण्यात आला.
सायंकाळी पुन्हा त्रास सुरू झाल्यावर खानविलकर यांनी रुग्णालयात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र अहवाल नसल्याने त्यांची घरातच मृत्यूशी झुंज सुरू होती. हृदयविकाराच्या झटक्यासारखे वाटल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या रुग्णालयात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
वृद्धाने सोडला घरातच प्राण
अंबरनाथ : येथील बुवापाडा परिसरात एका वृद्धाला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. मात्र श्वसनाचा त्रास म्हणजे कोरोनाचे लक्षण असल्याचे समजून त्या वृद्धाच्या मदतीला कुणीही धावले नाही. साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नसल्याने त्या वृद्धाने मंगळवारी घरातच प्राण सोडला.
शहरात दोन दिवसांपूर्वी वेळेवर उपचार न मिळाल्याने एका वृद्धाला प्राण गमवावे लागले होते. ४८ तासांनंतर बुवापाडा परिसरातही एका वृद्धाला जीव गमवावा लागला. या व्यक्तीला सकाळपासूनच श्वसनाचा त्रास होत होता; मात्र त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल न आल्याने उपचार तर सोडाच रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली नाही. नगरसेवकाने रुग्णालय प्रशासनाकडे रुग्णवाहिकेची मागणीही केली होती. मात्र रुग्णाची लक्षणे पाहता कोणीच मदतीला पुढे आले नाही.
कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता
अंबरनाथमधील परिस्थिती : लक्षणे असणाऱ्यांसाठी सोय नाही
पंकज पाटील ।
अंबरनाथ : शहरात मागील पाच दिवसांत पाच रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली, मात्र त्यांची कोरोनाची चाचणी न झाल्याने त्यांच्यावर कोणत्याच रुग्णालयात उपचार करण्यात आले नाहीत. या पाच रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने कमी पण उपचार न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरात ५०० बेडचे कोरोना रुग्णालय उभारत असताना किमान १० ते १५ बेड कोरोनाचे लक्षण असलेल्या व प्रकृती बिघडलेल्या रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याची गरज आहे. श्वसनाचा त्रास जाणवणाºया आणि ताप येणाºया रुग्णांना कोणत्याच रुग्णालयात उपचार मिळत नाही. आठ ते दहा तास या रुग्णांना रुग्णालयाच्या पायºया झिजविण्याची वेळ येते. शहरातील पाचपैकी दोन रुग्णांना ठाणे जिल्ह्यात कुठेच उपचार न मिळाल्याने मुंबईच्या नायर रुग्णालयात हलविण्याची वेळ आली. त्या दोघांचा जीव वाचला; मात्र इतर दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर एक रुग्ण सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
कोरोनाची लक्षणे असलेल्यांवर उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालयाची गरज आहे. आज त्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. उपचार तर सोडाच त्यांना साधी रुग्णवाहिकाही मिळत नाही.
यासंदर्भात अंबरनाथमधील छाया रुग्णालय प्रशासनाला काही देणेघेणे राहिलेले नाही. रुग्णाला थेट सेंट्रल किंवा कळवा हॉस्पिटलला पाठविण्याच्या सल्ल्याशिवाय दुसरे कुठलेच काम केले जात नाही.
त्रास होऊनही अनेक रुग्ण घरातच
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. मात्र कोरोनाचा रिपोर्ट न आलेल्या, परंतु कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोणतीच यंत्रणा मदत करीत नाही. त्यामुळे शहरात आजही अनेक रुग्ण त्रास होत असतानाही घरातच पडून आहेत. दुसरीकडे काही रुग्ण रुग्णालयांच्या शोधात आहेत. या समस्येची तीव्रता पालिका आणि छाया रुग्णालय प्रशासन यांना माहीत असतानाही त्यांनी यासंदर्भात आतापर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही, हे विशेष.