हत्येचा सात महिन्यानंतर उलगडा
By admin | Published: May 21, 2017 03:17 AM2017-05-21T03:17:30+5:302017-05-21T03:17:30+5:30
कल्याण-शीळ रोडनजीक असलेल्या निळजे येथे रेल्वे रुळालगत सात महिन्यांपूर्वी जहाँगीर आलम शेख (३०, रा. मदीना बिल्डिंग, मुंब्रा) याचा मृतदेह हत्या करून
- लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण-शीळ रोडनजीक असलेल्या निळजे येथे रेल्वे रुळालगत सात महिन्यांपूर्वी जहाँगीर आलम शेख (३०, रा. मदीना बिल्डिंग, मुंब्रा) याचा मृतदेह हत्या करून टाकण्यात आला होता. त्याच्या हत्येप्रकरणी मानपाडा पोलिसांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथून त्याचा साथीदार तौकिर आलम शेख (२८) याला अटक केली. तौकीरने पैशांच्या वादातून जहाँगीरची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले. कल्याण न्यायालयाने २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
निळजे येथे रेल्वे रूळावर १८ नोव्हेंबर २०१६ ला सायंकाळी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. हत्येचा संशय येऊ नये, यासाठी मृतदेह रूळावर ठेवून हा रेल्वे अपघात झाल्याचे भासवले. शवविच्छेदन अहवालात जहाँगीरच्या डोक्यावर आणि इतर शरीरावर जखमा आढळल्याने त्याची हत्या झाल्याचे उघड झाले होते. मात्र, १२ दिवसांनंतर मृत व्यक्तीचे नाव जहाँगीर असून तो मूळचा बिहारचा आहे. मात्र, सध्या तो मुंब्रा येथील मदिना बिल्डींगमधील एका खोलीत भाड्याने राहत असल्याचे समजले. त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशी करताच त्याच्याविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात व्यापाऱ्याचे अपहरण आणि खंडणीचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. जहाँगीरचा साथीदार तौकिर हा फरारी होता. त्यामुळे त्यानेच ही हत्या केल्याचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तौकिरच्या मूळगावी बिहारमधील निजामपूर, कटीयार येथे पोलीस निरीक्षक विजयकुमार राऊत व कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गेले. मात्र, तेथे तो त्यांना सापडला नाही. खबऱ्यांमार्फत तो पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात लपून बसल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले, राऊत आणि पोलीस उपनिरीक्षक विजय मोरे यांना मिळाली. त्यानुसार मोरे, पोलीस नाईक सुधीर कदम आणि किरण सोनवणे यांनी तेथे सापळा रचला. सहा दिवस वेश्यांतर करून त्याला एक मशिदीतून पकडले.
यापूर्वीही झाली होती अटक
जहाँगीर, तौकीर आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी एका व्यापाऱ्याचे अपहरण करत त्यांच्याकडे खंडणी मागितली होती. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली. जहाँगीर व साथीदारांनी जामीन मिळवून स्वत:ची सुटका करून घेतली. मात्र, तौकिरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला जामिनासाठी मदत केली नाही.
तौकिरने जामिनासाठी घरची जमीन ४० हजार रुपयांत विकली. कारागृहातून सुटल्यानंतर तौकिरने जहाँगीरकडे पैशांची मागणी केली. मात्र, तो पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होता. संतापलेल्या तौकिरने १७ नोव्हेंबर २०१६ ला वाशीतील एका बारमध्ये त्याला मद्यपानासाठी बोलावले. तेथे दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. त्यानंतर तो जहाँगीरला काटई येथे नातेवाइकांकडे झोपण्यासाठी घेऊन आला.
मात्र, निळजे येथील रूळालगत नेऊन डोक्यात दगड घालून हत्या केली. ओळख पटू नये, यासाठी त्याच्या खिशातील कागदपत्र काढून घेत हा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचला. व तो मालदा येथे पळून गेला. तेथे कोणाला संशय येऊ नये, यासाठी एका मशिदीत तो सेवक म्हणून काम करत होता. मानपाडा पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली.