उलगडले सतारीचे अंतरंग
By admin | Published: December 8, 2015 12:21 AM2015-12-08T00:21:38+5:302015-12-08T00:21:38+5:30
इंद्रधनू रंगोत्सवाच्या उद्घाटन पर्वामध्ये शेखर राजे आणि त्यांच्या सहकलाकारांनी सतार वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच डॉ. रेवा नातू यांनी शास्त्रीय संगीतामध्ये केलेल्या
ठाणे : इंद्रधनू रंगोत्सवाच्या उद्घाटन पर्वामध्ये शेखर राजे आणि त्यांच्या सहकलाकारांनी सतार वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच डॉ. रेवा नातू यांनी शास्त्रीय संगीतामध्ये केलेल्या कारकिर्दीबद्दल सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सतारवादनाकडे आई आणि मुलाचे जसे नाते असते तसे पाहावे, कारण कुठलेही वाद्य हे कलाकारासाठी त्याच्या आईच्या भूमिकेत असते, असे शेखर राजे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भूप रागाची ओळख शेखर राजे आणि त्यांच्या सहकलाकारांनी करून दिली. शास्त्रीय संगीत हे मुळातच एक शास्त्र आहे. त्यामुळे सतार वाजवताना कसे आसनस्थ व्हावे, याचे प्रात्यक्षिकही त्यांनी उपस्थितांना दिले.
विलायती खाँसाहेबांचे कट्टर शिष्य मारुती पाटील यांच्याकडून त्यांनी सतारवादनाचे धडे घेतले. या वेळी त्यांनी ‘बाई मी विकत घेतला श्याम’, ‘वंदे मातरम्’, ‘आपकी नझरोंने समझा प्यार की काबिल मुझे’, ‘नका सोडून जाऊ रंग महाल’, ‘कजरा रे कजरा रे तेरे काले काले नैना’ आदी गाणी वाजवून रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यानंतर बाउंड संगीत म्हणजेच सुफीगीत आणि भक्तिगीत यांचे एकत्रितरीत्या मिश्रण सादर केले. या वेळी डॉ. रेवा नातू यांनीदेखील आपल्या भावना ‘एकतारी संगे एकरूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो’ या गाण्यातून व्यक्त केल्या.
सतारवादनाबरोबरच ती बनविणे, ही एक कला असून त्यासाठी लागणारा भोपळा हा पंढरपूर आणि कोलकाता येथे उत्तम मिळतो. निवेदिका दीपाली केळकर यांनी खुमासदार शैलीतून उत्कृष्ट असे निवेदन केले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, टीजेएसबी बँकेचे सतीश उतेकर, शशिकांत देशमुख आणि इंद्रधनू परिवारातील सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)