निवडणूक काळातही युतीमध्ये बेबनाव कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:32 AM2019-10-15T00:32:38+5:302019-10-15T00:32:52+5:30

शिवसैनिकांची मीरा-भार्इंदरकडे पाठ : ओवळा-माजिवड्यात भाजपचे पदाधिकारी फिरकेना

Unrest in the coalition continued even during the election period | निवडणूक काळातही युतीमध्ये बेबनाव कायम

निवडणूक काळातही युतीमध्ये बेबनाव कायम

Next

मीरा रोड : ओवळा-माजिवडाचे शिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात राहणारे भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी सरनाईकांऐवजी मीरा-भार्इंदरचे भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या मतदारसंघात प्रचार करत आहेत. त्याचप्रमाणे मीरा-भार्इंदर मतदारसंघातील सेनेचे नगरसेवक, पदाधिकारीदेखील सरनाईकांच्या मतदारसंघात काम करत असल्याने भाजप-शिवसेनेत आलबेल नसल्याचे दिसत आहे.


मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपने मेहतांना, तर ओवळा-माजिवडामधून शिवसेनेने सरनाईकांना उमेदवारी दिली आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून सरनाईकांच्या मतदारसंघातील भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी सेना उमेदवाराचा प्रचार न करता शेजारच्या मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघात मेहतांच्या प्रचारास लागले आहेत. त्यांना प्रभागनिहाय जबाबदारी देण्यात आली असून, सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना मेहतांच्या प्रचार व नियोजनाचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे सेनेच्या सरनाईकांसाठी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी रॅलीमध्ये किंवा क्वचितप्रसंगी दिसत आहेत. तशीच स्थिती मीरा-भार्इंदर मतदारसंघात आहे. मेहतांच्या प्रचाराऐवजी शिवसैनिक ओवळा-माजिवडा मतदारसंघात सरनाईकांच्या प्रचारात गुंतलेले आहेत. काही रॅली, पदयात्रांमध्ये अपवादात्मक वेळी सेनेचे पदाधिकारी भाजपच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसोबत दिसतात.

शिवसेना वा भाजपकडूनदेखील याबद्दल फारसे गांभीर्याने घेतले जात नसून, दुसऱ्यांपेक्षा आपल्याच पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकाºयांवर उमेदवारांनी जास्त विश्वास दाखवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेनेतील संतापाला जुनी कारणे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सरनाईकांच्या मतदारसंघात जुने उद्योग तोडण्यावरून मेहता व त्यांच्यात टोकाचा वाद झाला होता. त्यावेळी मेहतांनी सरनाईकांना पाडण्याचा इशारा दिला होता. सरनाईकांसह सेनेच्या नगरसेवकांची कामे व निधी रोखणे आदी प्रकार केले गेले. निवडणुकीच्या जाहिरात फलकांमध्येदेखील मेहतांनी बाळासाहेबांना स्थान न दिल्याने शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर, मेहतांनी फलक बदलून त्यात बाळासाहेबांचे छायाचित्र टाकले. या सर्व प्रकारांमुळे शिवसैनिकांमध्ये मेहतांबद्दल निर्माण झालेला रोष शिवसैनिकांनी जाहीरपणे व्यक्त केला आहे.


मेहतांनी त्यांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेजवळ आयोजित युतीच्या मेळाव्यातदेखील शिवसैनिकांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते. सरनाईकांना ठाण्याला जायचे असल्याने ते भाषण आटोपून मेळाव्यातून निघाले असता, बहुसंख्य शिवसैनिकदेखील खुर्च्या सोडून निघून गेले. खासदार गोपाळ शेट्टी आदींचे भाषण होईपर्यंत जवळपास निम्म्यापेक्षा जास्त मैदान रिकामे झाले होते. याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या सर्व विषयांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
 

होय, या प्रकाराबाबत आमदार सरनाईकांनीदेखील फोनवरून सांगितले आहे. लवकरच त्यांच्या मतदारसंघातील भाजप व शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेणार आहोत. मध्यंतरीच्या काळात भाजप-सेनेत झालेले वाद आता संपले असून, सर्वजण युतीसाठी काम करत आहेत. युतीच्या मेळाव्यात नंतर कार्यकर्ते निघून गेले, हे खरे असले तरी, सकाळपासून ते काम करत असल्याने थकले होते. त्यातच सभेला उशीर झाल्याने ते गेले.
- हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, भाजप

Web Title: Unrest in the coalition continued even during the election period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.