मनसेमुळे ठाणे, कल्याणमध्ये शिंदेसेनेत अस्वस्थता, विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला धसका 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 12:49 PM2024-03-21T12:49:01+5:302024-03-21T12:56:13+5:30

मागील विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात मनसेला थोडी थोडकी नव्हे, तर एक लाख ७० हजार मते मिळाली होती. ही मते महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात पडणार का, याबाबत कुतूहल आहे.

Unrest in Shindesena in Thane, Kalyan due to MNS, office-bearers willing to contest assembly elections take a plunge | मनसेमुळे ठाणे, कल्याणमध्ये शिंदेसेनेत अस्वस्थता, विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला धसका 

मनसेमुळे ठाणे, कल्याणमध्ये शिंदेसेनेत अस्वस्थता, विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला धसका 

- अजित मांडके / अनिकेत घमंडी 

ठाणे / डोंबिवली : महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एन्ट्रीमुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांत शिवसेनेच्या शिंदे गटात पडसाद उमटू लागले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात मनसेला थोडी थोडकी नव्हे, तर एक लाख ७० हजार मते मिळाली होती. ही मते महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात पडणार का, याबाबत कुतूहल आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे राजू पाटील यांना मागील वेळी यश मिळाले. या मतदारसंघातून यंदा विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ती जागा महायुतीच्या वाटपात मनसेला जाणार, याची कल्पना आल्याने त्यांच्यातही अस्वस्थता आहे.

ठाणे लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ मते मिळाली होती.  त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांत वाढ झाली. २०१९ मध्ये मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहरात अविनाश जाधव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत मनसेने ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रचार केल्याने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मनसेला खुलेआम मदत केली होती. शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी युतीचा धर्म मोडत मनसेला छुपी मदत केल्याची चर्चा होती. त्यामुळेच जाधव यांना या मतदारसंघात ७२ हजार ८७४ मते मिळाली होती. 

ठाणे विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाची मते
 २०१९ च्या विधानसभेत ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून मनसेला १ लाख ७० हजारांच्या आसपास मते मिळाली. ठाणे विधानसभा मतदारसंघात मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. 
 कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मते मनसेला मिळाली होती. मीरा-भाईंदर आणि ऐरोली मतदारसंघात मनसे पिछाडीवर होती. 

कल्याण ग्रामीणवरून...
कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे आमदार राजू पाटील मागीलवेळी विजयी झाले. शिवसेनेचे शिंदे गटाचे शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, युवा सेना पदाधिकारी, तालुका स्तरावरील नेते येत्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची स्वप्ने पाहत होते. मनसे महायुतीत आल्याने ती जागा मनसेला सोडल्यास आपली आमदारकीची स्वप्ने धुळीस मिळणार, या कल्पनेने शिवसेनेत अस्वस्थता आहे.

शिवसेनेत हे आहेत इच्छुक
रमेश म्हात्रे, राजेश मोरे, रमाकांत मढवी, महेश पाटील, दीपेश म्हात्रे, राजेश कदम यांच्यासह अनेक जण कल्याण ग्रामीण मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. विधानसभेलाही मनसे महायुतीत राहिल्यास त्यांच्या महत्त्वाकांक्षेवर बोळा फिरणार आहे.

Web Title: Unrest in Shindesena in Thane, Kalyan due to MNS, office-bearers willing to contest assembly elections take a plunge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.