पालघर जिल्ह्यातील अवेळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:35 AM2020-12-14T00:35:30+5:302020-12-14T00:35:34+5:30
कडधान्ये, पेंढा व विटांचे नुकसान ; आरोग्य धोक्यात येण्याची भीती
वाडा : पालघरमधील वाडा तालुक्यासह इतरही तालुक्यात सलग दोन दिवस रिमझिम झालेल्या पावसाचा रविवारी सकाळी मात्र जोर थोडा वाढला. या अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे पीक तर खराब झाले, परंतु गवत, पावली भिजल्याने तेही वाया गेले. जिल्ह्यातील वीट व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एकूणच अवेळी पावसाने शेतकरी, काबाडकष्ट करणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
सध्या रब्बी हंगाम असून हरभरा, मूग, वाल यासारख्या पिकांवर या अवेळी पावसाचा दुष्परिणाम होणार आहे. तर गवार, मेथी, वांगा, मुळा, मिरची आदी लागवड केलेला भाजीपाला वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तसेच झोडणी करून विक्रीसाठी गंजी रचून ठेवलेला पेंढा या पावसात काळा पडल्याने तो व्यावसायिक सहसा खरेदी करत नाहीत. नुकत्याच सुरू झालेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचेही अवेळी पावसाने नुकसान होणार असून कच्च्या विटा विरघळून जाण्याची भीती आहे.
गेले तीन दिवस वातावरणातील सततच्या बदलामुळे सर्दी, खोकला, ताप व इतर साथींचे आजार बळावण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. आधीच कोरोनामुळे घाबरलेली जनता या पावसामुळे बदललेल्या वातावरणाने अधिक चिंताग्रस्त झाली आहे.
कासात वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान
कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीट उद्योजक, पावली व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रोगराई पसरण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात ढगाळ वातावरण असून पाऊस रिमझिम स्वरूपात पडत आहेत. त्यामुळे भाजीपाला लागवड व इतर पिकांवर त्याचा परिणाम होऊन मोठे नुकसान होणार आहे. कासा येथे मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. त्यामुळे गवत पावली विक्रीचा व्यवसाय अनेक जण करतात. मात्र पावसामुळे गवत पावली भिजली असून पाऊस चालू राहिला तर ती कुजण्याची शक्यता व्यावसायिक सुनील पाटील यांनी व्यक्त केली. यामुळे गाई-म्हशींच्या उन्हाळ्यातील चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे.
दुसरीकडे वीट व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून साधारण व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. विटा पाडण्याचे काम आताच सुरू केल्याने फडावर उभ्या असणाऱ्या विटा भाजण्याच्या आधीच भिजून गेल्या आहेत, तर काही फड कोसळून पडला आहे. त्यामुळे वीट व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही विटांवरील नक्षीचे कामही तुटून गेले आहे.
कासा येथे भाजीपाला लागवड त्याचप्रमाणे कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. चालू वर्षी कृषी विभागाकडून हरभऱ्याचे बियाणे देऊन उत्पादन वाढवण्यासाठी प्रात्यक्षिकेही घेण्यात आली होती. भाजीपाला व मिरची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते. मात्र अवेळी पाऊस आणि खराब हवामान यामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याचे शेतकरी मंगेश केदार यांनी सांगितले. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता असून शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.