"...तो पर्यंत बस रस्त्यावर काढणार नाही"; ठाण्यात परिवहनच्या कंत्राटी चालकांनी उपसले संपाचे हत्यार

By अजित मांडके | Updated: December 17, 2024 16:28 IST2024-12-17T16:27:51+5:302024-12-17T16:28:40+5:30

ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून २०१६ पासून खाजगी ठेकेदारामार्फत २२० बस चालविल्या जात आहेत. त्याठिकाणी ५५० कंत्राटी चालक हे सद्यस्थितीत कामावर आहेत.

"...until then, buses will not be on the road"; Thane's contract transport drivers take up arms for strike | "...तो पर्यंत बस रस्त्यावर काढणार नाही"; ठाण्यात परिवहनच्या कंत्राटी चालकांनी उपसले संपाचे हत्यार

"...तो पर्यंत बस रस्त्यावर काढणार नाही"; ठाण्यात परिवहनच्या कंत्राटी चालकांनी उपसले संपाचे हत्यार

ठाणे : पगार वाढ आणि दंड आकारण्याच्या विरोधात मंगळवारी पहाटेपासून अचानक ठाणे परिवहन सेवेच्या खासगी ठेकेदाराच्या ५५० कंत्राटी चालकांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. परंतु कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाचा फटका सकाळच्या सत्रात शाळेत जाणारे विद्यार्थी आणि चारकमान्यांना बसला. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा संपच बेकायदेशीर असल्याचा दावा परिवहन प्रशासनाने केला आहे.

ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून २०१६ पासून खाजगी ठेकेदारामार्फत २२० बस चालविल्या जात आहेत. त्याठिकाणी ५५० कंत्राटी चालक हे सद्यस्थितीत कामावर आहेत. परंतु त्यांनी मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासूनच संपाचे हत्यार उपसल्याचे दिसून आले. 

त्यामुळे घोडबंदर आनंद नगर डेपोतून दिवसभरात एकही बस बाहेर पडू शकली नाही. परिवहनच्या ताफ्यात सद्यस्थितीत ४७४ च्या आसपास बस उपलब्ध आहेत. परंतु त्यातील परिवहनच्या मालकीच्या असलेल्या केवळ ६० च्या आसपास बसचाच समावेश आहे. उर्वरीत बस दोन खाजगी ठेकेदारांच्या मार्फत चालविल्या जात आहेत. त्यात २२० बस या आनंद नगर आणि १२३ इलेक्ट्रीक बस या कोपरी पूर्व भागातून रस्त्यावर धावत आहेत. त्यातही परिवहनच्या ताफ्यात असलेल्या ३० व्होल्वो एसी बसपैकी अवघ्या दोन बस रस्त्यावर धावत आहेत.

त्यातही आनंद नगर भागातून आजच्या घडीला २२० बस रस्त्यावर धावत आहेत. त्या बस घोडबंदर, मिराभार्इंदर, तसेच शहरातील इतर भागातही धावत आहेत. परंतु येथील चालकांनीच अचानक संपाचे हत्यार पुकारल्याने येथील एकही बस रस्त्यावर धावू शकलेली नाही. 

कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

या कर्मचाऱ्यांनी पगार वाढीची मागणी केली आहे. तसेच जो दंड आकारण्यात येतो तो देखील रद्द करावा, अशी मागणी केली आहे. शासकीय नियमानुसार पगारात वाढ करुन न देता पगाराचे स्ट्रक्चर हे चुकीच्या पद्धतीने कामगार वर्गांना दाखवून कामगारांची दिशाभूल करुन विचारणा केली असता कंपनी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तो पर्यंत एकही गाडी बाहेर काढणार नसल्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

परिवहनच्या उत्पन्नाला फटका

परिवहनच्या ताफ्यात असलेल्या एकूण बसपैकी रोज ३८० च्या आसपास बस रस्त्यावर धावत असतात. परंतु कंत्राटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे रस्त्यावर अवघ्या १७५ बस धावल्या आहेत. त्यात इलेक्ट्रीक १२३ आणि परिवहनच्या स्वत:च्या ६० बसचा समावेश आहे. परंतु २२० बस रस्त्यावर न उतरल्याने परिवहनचे उत्पन्न देखील २६ लाखांवरुन १० ते १२ लाखांवर आल्याचे सांगण्यात आले आहे.

तोडगा काढण्यासाठी कर्मचारी आणि ठेकेदाराबरोबर चर्चा केली आहे. परंतु कर्मचाºयांच्या मागण्या या अधिकच्या आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी ठेकेदाराला सांगण्यात आले असून लवकरात लवकर संप मागे घ्यावा असेही नमुद करण्यात आले आहे, असे टीएमटी परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी म्हटले आहे. 

Web Title: "...until then, buses will not be on the road"; Thane's contract transport drivers take up arms for strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.