‘पेसा’च्या ५६.२४ कोटींतून उत्थान; आदिवासींसाठी विकासकामे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 02:09 AM2018-03-25T02:09:30+5:302018-03-25T02:09:30+5:30
राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अर्थात, आदिवासी ग्रामपंचायतींना पेसा कायद्यांतर्गत ५ टक्के निधीतून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ७०८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील १,३१३ आदिवासी गावपाड्यांना ५६ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यातून त्या गावपाड्यांतील आदिवासींसाठी विकासकामे करणे शक्य होणार आहे.
- नारायण जाधव
ठाणे : राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अर्थात, आदिवासी ग्रामपंचायतींना पेसा कायद्यांतर्गत ५ टक्के निधीतून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ७०८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील १,३१३ आदिवासी गावपाड्यांना ५६ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यातून त्या गावपाड्यांतील आदिवासींसाठी विकासकामे करणे शक्य होणार आहे.
पेसा ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील आदिवासीपाड्यांच्या उत्थानासाठी आदिवासी विकास विभागाकडून हे दरडोई लोकसंख्येनुसार अनुदान देण्यात येते. यानुसार, २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विकास विभागाने २१४ कोटी ३० लाख ८७ हजार रुपयांची तरतूद केली होती. यातून हे अनुदान ठाणे-पालघर जिल्ह्यांतील पेसा ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे.
यात ठाणे जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ४०४ आदिवासीपाड्यांच्या क्षेत्रात राहणाऱ्या १ लाख ७९ हजार ५६२ लोकसंख्येकरिता ८ कोटी ७१ लाख १७ हजार रुपये देण्यात आले आहेत. तर, पालघर जिल्ह्यातील ५०४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ९१० आदिवासीपाड्यांत राहणाºया ९ लाख ७९ हजार ५६३ लोकसंख्येकरिता ४७ कोटी ५२ लाख ४८ हजार रुपये दरडोई ४८५.१६ रुपयांप्रमाणे देण्यात आले आहेत. या माध्यमाचा आदिवासींना फायदा होणार आहे.
तालुकानिहाय आदिवासी गावपाडे
- ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील १०१ आदिवासी गावपाडे, भिवंडीच्या ३९ ग्रामपंचायतींच्या
क्षेत्रातील ७२ आणि शहापूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील २८० आदिवासी गावपाड्यांचा यात समावेश आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील १७७ आदिवासी गावपाडे, तलासरीच्या ४१ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ६१, पालघरच्या
१०८ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील १७१, वसईच्या ६४ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ७६, मोखाड्याच्या २७ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ५६, जव्हारच्या ५० ग्रामपंचायतींतील १०८, वाड्यातील ८४ ग्रामपंचायतींतील १६८ आणि विक्रमगड तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ९३ अशा ५०४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ९१० आदिवासी गावपाड्यांचा समावेश आहे.
लोकसंख्येचे प्रमाण
यात ठाणे जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतींची एकूण लोकसंख्या ४ लाख ५३ हजार ७६६ असून, त्यात आदिवासींची लोकसंख्या १ लाख ७९ हजार ५६२ इतकी आहे. टक्केवारीत हे प्रमाण ३९.५७ टक्के आहे, तर पालघर जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतींची एकूण लोकसंख्या १३ लाख २४ हजार ५७ असून, त्यात ९ लाख ७९ हजार ५६३ इतकी आहे. टक्केवारीत हे प्रमाण ७३.९८ टक्के आहे.