"राज्य सरकारच्या करिअर पोर्टलमध्ये उर्दू भाषेचा समावेश करावा"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 12:25 AM2021-04-05T00:25:24+5:302021-04-05T00:25:36+5:30
रईस शेख यांची मागणी : शालेय शिक्षणमंत्र्यांची घेतली भेट
भिवंडी : भिवंडी मनपा शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा व येथील शिक्षकांबरोबरच मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख प्रयत्नशील असून याबाबत नुकतीच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी भिवंडीतील मनपा शाळांमधील शैक्षणिक सुविधा व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार शेख यांनी चर्चा केली. त्याचबरोबर राज्यातील विद्यार्थ्यांकरिता सुरू केलेल्या करिअर पोर्टलबाबत सूचनाही केल्या.
करिअर पोर्टलमुळे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक प्रकारच्या शिष्यवृत्यांविषयी माहिती तसेच विविध महाविद्यालये यांविषयी इत्यंभूत माहिती मिळत असून ही माहिती एकूण आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे. परंतु अशा या अतिशय महत्त्वाच्या करिअर पोर्टलची माहिती उर्दू भाषेमध्ये उपलब्ध नसल्याने शेख यांनी खंत व्यक्त केली. मराठी आणि इंग्रजी पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर शाळांची संख्या असणाऱ्या उर्दू भाषिक विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता शासनाच्या महत्त्वाच्या माहिती पोर्टलपासून विद्यार्थ्याचा मोठा वर्ग वंचित राहत असून या पोर्टलवर उर्दू भाषेचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी शेख यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली.
भिवंडी निजामपूर शहर महापालिका हद्दीतील महापालिका शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असताना इतर जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मनपा शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव असून शिक्षकांअभावी गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याची बाब शेख यांनी निदर्शनास आणून दिली आहे. मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वर्गखोल्यांची गरज असतांनाही बांधकाम अनेक वर्षांपासून करण्यात आलेले नाही. तसेच मनपाच्या अनेक शाळा इमारतीची दुरवस्था झाली असून त्या अनेक शाळांच्या इमारती धोकादायक झाल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुसज्ज इमारतींसाठी निधी द्यावा
या धोकादायक इमारती पाडून त्या जागेवर नव्या सुसज्ज शाळा इमारत बांधण्यासाठी मनपा प्रशासनाला निधी व निर्देश देण्यात यावे तसेच इमारत बांधकाम करतांना येणाऱ्या अडचणी शासन स्तरावरून सोडवाव्या तसेच मुख्याध्यापक पदोन्नती २०१४ पासून दिली गेली नाही ती देण्यात यावी अशा विविध मागण्या आमदार रईस शेख यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केल्या आहेत. काही मागण्या मान्य करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे ते म्हणाले.