ठाकुर्ली स्थानकातून लोकल सोडण्याचा आग्रह
By admin | Published: March 31, 2017 05:39 AM2017-03-31T05:39:19+5:302017-03-31T05:39:19+5:30
ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी स्थानकातील विविध समस्या प्रवाशांना
डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी स्थानकातील विविध समस्या प्रवाशांना भेडसावत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने या समस्या तातडीने सोडवाव्यात, तसेच ठाकुर्ली लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी भाजपा नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी लाक्षणिक उपोषण केले.
ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील फाटकाजवळ नगरसेविका चौधरी, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, भाजपा प्रभाग अध्यक्ष रवींद्र चौधरी, सुनील भगत, ज्येष्ठ नागरिक व महिला भरउन्हाचा तडाखा सहन करत दिवसभर उपोषणाला बसले होते. मात्र, रेल्वेचा एकही अधिकारी उपोषणस्थळी भेट घेण्यासाठी आला नसल्याचे चौधरी यांनी सांगितले.
कल्याण व ठाकुर्ली रेल्वे स्थानकांत ३० कोटी रुपये खर्च करून विकासकामे केली जात आहेत. जवळपास १७ कोटी रुपये खर्च करून ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. स्थानकानजीक शहराच्या पूर्वेला मुंबईच्या दिशेने असलेला जुना पादचारी पूल अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे त्यावरून केवळ दोनच प्रवासी येजा करू शकतात. हा पादचारी पूल अत्यंत गैरसोयीचा आहे. स्थानकाच्या विस्तारीकरणात कल्याणच्या दिशेने सरकता जिना बसवण्यात येत आहे. पूर्वेला मुंबईच्या दिशेलाही सरकता जिना बसवावा, अथवा जुन्या पादचारी पुलाचे विस्तारीकरण करावे. त्याचबरोबर ठाकुर्ली गावठाणात होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी महिला समिती शाळेशेजारून जाण्यायेण्याकरिता बायपास रस्ता तयार करावा, तसेच स्थानकातील फाटक बंद करावे, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. स्थानकात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावरून येणारी वाहने ठाकुर्ली रेल्वे फाटकातून डोंबिवली पश्चिमेला जातात. त्यामुळे फाटकाजवळ दोन्ही बाजूंना कोंडी होते. यामुळे सामान्य नागरिकांना फाटक ओलांडणे जिकिरीचे बनले आहे. तसेच फाटक बराच वेळ उघडे राहिल्यास त्याचा फटका लोकल आणि लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकाला बसत आहे.
दिवा येथे लोकवस्ती व प्रवासी वाढल्याचे कारण पुढे करत दिवा प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वेने दिव्याला जलद लोकलना थांबा दिला. त्याचप्रमाणे जलद लोकलना ठाकुर्ली येथेही थांबा द्यावा. ठाकुर्ली स्थानक विस्तारीकरण करताना फलाट क्रमांक-१ला होम प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. त्यामुळे ठाकुर्ली लोकल सुरू करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.
ठाकुर्ली पूर्व भागाच्या दिशेने रेल्वे मार्गाला समांतर पदपथ तयार करून दिल्यास प्रवासी व पादचारी यांना या मार्गाने कल्याणच्या दिशेने ठाकुर्ली परिसरात जाता येईल. त्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात गाडीखाली सापडून प्रवासी मरण पावतात. त्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, याकडे चौधरी यांनी लक्ष वेधले आहे.
(प्रतिनिधी)
१२ वर्षांपासून लढा
मागील १२ वर्षांपासून चौधरी ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सोयीसुविधा व विकासासाठी पाठपुरावा करत आहेत. हा पहिला लढा जिंकल्यानेच ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण होत आहे. आता प्रवासांच्या सोयीसुविधांसाठी पुन्हा दुसरा लढा सुरू केला आहे. त्यासाठी प्रवाशांनी हजारोंच्या संख्येने उपोषणस्थळी भेट देऊन स्वाक्षऱ्या करून चौधरी यांच्या उपोषणाला व मागण्यांना पाठिंबा दिला आहे. नागरिक व प्रवासी यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन रेल्वे प्रशासनास दिले जाणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले.