रिझवानच्या मोबाइलमध्ये सांकेतिक भाषेचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 05:21 AM2018-03-19T05:21:16+5:302018-03-19T05:21:16+5:30
अॅड. रिझवान सिद्दिकी यांच्या मोबाइल फोनमध्ये लोकांचे मोबाइल नंबर सांकेतिक भाषेमध्ये साठवले असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात शुक्रवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली होती.
ठाणे : अॅड. रिझवान सिद्दिकी यांच्या मोबाइल फोनमध्ये लोकांचे मोबाइल नंबर सांकेतिक भाषेमध्ये साठवले असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात शुक्रवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली होती.
सीडीआर प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी रात्री बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांचे वकील रिझवान सिद्दिकी यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी रिझवान सिद्दिकी यांचे तीन मोबाइल फोन आणि दोन लॅपटॉप हस्तगत केले होते. त्यापैकी एक मोबाइल फोन पोलिसांनी पंच व साक्षीदारांच्या समोर सुरू केला. पोलिसांनी हा मोबाइल फोन तपासला असता, त्यामध्ये बºयाच लोकांचे मोबाइल नंबर सांकेतिक भाषेमध्ये साठवले असल्याचे समजले. इंग्रजीतील पहिले नाव व आडनावाचे पहिले आद्याक्षर घेऊन अॅड. सिद्दिकी यांनी काही मोबाइल नंबर साठवले आहेत. त्याचा अर्थ समजून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती तपास अधिकाºयांनी दिली.
मोबाइल फोन्स व लॅपटॉपमधील माहिती नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीकडून केला जाऊ शकतो, अशी शंका पोलिसांनी शनिवारी अॅड. सिद्दिकी यांना न्यायालयासमोर हजर केले त्या वेळी व्यक्त केली होती. अॅड. सिद्दिकी यांच्याकडून हस्तगत मोबाइल फोन, लॅपटॉपची तपासणी सुरू आहे. त्यामधील माहिती नष्ट केल्याची
शंका आल्यास ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवून नष्ट केलेली माहिती मिळवली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. बॉलीवूडमधील अनेक अभिनेते अॅड. सिद्दिकी यांचे अशील आहेत. त्यांच्या अटकेने ठाणे पोलिसांचे हात बॉलीवूडमध्ये आणखी कुणा-कुणापर्यंत पोहोचतात, हे
समजू शकेल.
।दामदुप्पट विक्री
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १२ आरोपींना अटक केली. त्यापैकी एका आरोपीकडून अॅड. सिद्दिकी यांनी प्रत्येकी १० ते २० हजार रुपयांमध्ये सीडीआर मिळवल्याचा दावा पोलिसांनी शनिवारी न्यायालयामध्ये केला. हे सीडीआर अॅड. सिद्दिकी त्यांच्या अशिलांना ५० हजार ते १ लाख रुपयांमध्ये विकायचे, असा आरोपही पोलिसांनी केला.