वृक्षवल्ली प्रदर्शनात कृत्रिम वस्तूंचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 04:39 AM2020-01-11T04:39:09+5:302020-01-11T04:39:14+5:30
ठाण्याच्या रेमण्ड कंपनी मैदान येथे शुक्रवारपासून झाडे, फुले, फळे व भाजीपाला स्पर्धा व भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने वृक्षवल्ली उपक्र मांतर्गत ठाण्याच्या रेमण्ड कंपनी मैदान येथे शुक्रवारपासून झाडे, फुले, फळे व भाजीपाला स्पर्धा व भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी येणाऱ्यांना वृक्षांचे महत्त्व पटवून देण्याऐवजी कृत्रिम वस्तूंचा, फुलांचा, कार्पेटचा अधिक वापर केल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी या प्रदर्शनासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, यातून पालिकेचा उद्देश सफल होतो का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
वृक्षवल्ली २०२० या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा शुक्र वारी दुपारी ३ वाजता पार पडला. झाडांचे जतन व्हावे, नवीन झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता व्हावी, याकरिता वृक्षवल्ली उपक्र मांतर्गत गेल्या १२ वर्षांपासून ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने असे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. या प्रदर्शनामध्ये नागरिकांना आवडती शोभिवंत झाडे, फुलांची रोपे, कुंड्या, हंगामी फुलांची रोपे, औषधी वनस्पती, गुलाब रोपे, फळझाडे, उद्यानासाठीची अवजारे, बी-बियाणे, खते आदींची खरेदी करता येणार आहे. असे असले तरी या ठिकाणी प्रवेश करतानाच कृत्रिम फुलांचा, विविध छटांचा मारा केल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे ठाणे महापालिका प्लास्टिकबंदीसाठी पुढाकार घेत असताना दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने प्लास्टिकवापराला प्रोत्साहन तर देत नाही ना, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.