राज्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेडचा वापर;आधार कार्डसाठी दुरुपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:44 AM2019-02-15T01:44:59+5:302019-02-15T01:45:20+5:30

वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बनावट लेटरहेड, सही, शिक्क्यांचा वापर करून त्याद्वारे बनावट आधार कार्ड बनवून फसवणूक केल्याप्रकरणी अशोक काठे (३०, रा. मोठागाव) आणि अनिल सिंदकर (७४, रा. कोपरगाव) यांना विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे.

 Use of fake letterhead of state minister; Abuse for Aadhaar card | राज्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेडचा वापर;आधार कार्डसाठी दुरुपयोग

राज्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेडचा वापर;आधार कार्डसाठी दुरुपयोग

Next

डोंबिवली : वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बनावट लेटरहेड, सही, शिक्क्यांचा वापर करून त्याद्वारे बनावट आधार कार्ड बनवून फसवणूक केल्याप्रकरणी अशोक काठे (३०, रा. मोठागाव) आणि अनिल सिंदकर (७४, रा. कोपरगाव) यांना विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे.
आधार कार्ड काढण्यासाठी काही नागरिकांना चव्हाण यांच्या नावे शिफारसपत्र दिले जात होते. मात्र, त्यासाठी त्यांचे बनावट लेटरहेड, सही, शिक्क्यांचा वापर होत असल्याची माहिती भाजपाचे नगरसेवक राजन आभाळे यांना मिळाली होती. त्या माहितीची शहानिशा करण्यासाठी आभाळे यांनी वैभव गवस याला आधार कार्ड बनविण्याच्या बहाण्याने संबंधित ठिकाणी पाठविले. त्यानुसार, वैभवने एका शिवसेना शाखेजवळ बसणाऱ्या सिंदकर याच्याशी संपर्क साधला. ‘मला आधार कार्ड बनवायचे आहे. पण, मी भाड्याच्या खोलीत राहतो. त्यामुळे माझ्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत,’ असे सिंदकरला त्याने सांगितले. त्या वेळी, ‘आधार कार्ड बनविण्यासाठी एक हजार रुपये खर्च होईल,’ असे सिंदकरने सांगितले.
वैभवने ७ फेब्रुवारीला सिंदकरला हजार रुपये आणि दोन पासपोर्ट फोटो दिले. १० फेब्रुवारीला सिंदकर याने वैभवला फोन करीत पूर्वेतील रामनगर वाहतूक शाखेच्या पाठीमागील सायबर कॅफेमध्ये बोलावले. तेथे आधीपासूनच असलेल्या काटे याने आधार कार्ड बनविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चव्हाण यांच्या लेटरहेडवर वैभवचे ओळखपत्र स्कॅन करून दिले. या प्रकरणी वैभवच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

Web Title:  Use of fake letterhead of state minister; Abuse for Aadhaar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.