तेल वापरा, तरीही ह्रदयरोग पळवा!
By Admin | Published: January 6, 2016 01:03 AM2016-01-06T01:03:05+5:302016-01-06T01:03:05+5:30
रक्तदाब, स्थूलपणा, कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवून ह्रदय शाबूत राखण्याकरिता सध्या वेगवेगळ््या ब्रॅण्डेड कंपन्यांचे खाण्याचे तेल वापरण्याकडे लोकांचा कल असताना
मुरलीधर भवार, डोंबिवली
रक्तदाब, स्थूलपणा, कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवून ह्रदय शाबूत राखण्याकरिता सध्या वेगवेगळ््या ब्रॅण्डेड कंपन्यांचे खाण्याचे तेल वापरण्याकडे लोकांचा कल असताना लाकडी घाण्यावर काढलेले, नैसर्गिक, आरोग्यवर्धक तेल उपलब्ध करून देण्याचा प्रयोग येथील वर्षा दांडेकर यांनी सुरु केला आहे. विशेष म्हणजे लोकांचा अवघ्या महिन्याभरात त्यांना चांगला प्रतिसाद मिळला आहे.
तेल म्हटले की, तिळाचे. तिळापासून तेल हा शब्द आला असल्याचे भाषेचे जाणकार सांगतात. अनेक कंपन्या तेलाचे उत्पादन करतात. त्यांच्या तेलाचा दर्जा आणि गुण इतर कंपन्यांपेक्षा कसे चांगले आहेत, याचा दावा जाहिरातीतून केला जातो. तेल कंपन्या खाद्य तेलाचे उत्पादन करताना त्यावर रासायनिक प्रक्रिया करतात. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रोल वाढते. घाण्यावर काढलेल्या तेलात गुड कोलेस्ट्रोलचे प्रमाण अधिक असल्याने शरीराला फायदाच होतो.
दांडेकर यांनी लाकडी घाण्यावर काढलेले तेल रामनगर, शिवमंदिर रोडवरील शिवकृपा येथे मिळते. सध्या पांढऱ्या व काळ््या तिळाचे, खोबरेल, जवस, अक्रोड, शेंगदाणा, मोहरी, करडई, बदाम तेल उपलब्ध होते. याविषयी दांडेकर यांनी सांगितले की, त्यांची भाची आरती सागर जोशी हिला ठाण्यातील एका डॉक्टराने सल्ला दिला की, लाकडी घाण्यावर काढलेले तेल खाण्यात वापरले तर त्याचा आरोग्याला चांगला फायदा होईल. तिने त्याचे पालन केले.
लाकडी घाण्यावर गेली ४० वर्षे तेला काढून विक्री करणाऱ्या पुण्याच्या रामकृष्ण आईल मिलकडे दांडेकर गेल्या. त्यांनी सांगितले की, डोंबिवली व मुंबईच्या उपनगरातून काही लोक पुण्याला येऊन हे तेल घेऊन जातात. दांडेकर यांनी सुरुवातीला पुण्यातून तेल आणून ते विकण्यास सुरुवात केली. महिन्याभरात ६० लीटर तेलाची विक्री झाल्याने या तेलास मागणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
ह्रदयासाठी करडईचे तेल उपयुक्त आहे. आक्रोडाचे तेल केसांच्या मजबूतीसाठी व केसातील कोंडा व शुष्कपणा दूर करणारे आहे. दांडेकरांनी विक्री करण्यापूर्वी आधी स्वत: तेल वापरून पाहिले. डोंबिवलीत सोय झाल्याने पुण्याला जाण्याची गरज भासत नसल्याचे अनेकांनी दांडेकर यांना सांगितले.