भिवंडीतील डाईंग सायझिंगमध्ये प्लास्टिक चिंध्यांचा सऱ्हास वापर; प्रदूषणामुळे नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 05:02 PM2021-08-04T17:02:55+5:302021-08-04T17:03:31+5:30
कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून भिवंडी शहर सर्वत्र परिचित आहे . कापड उद्योग मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायजिंग कंपन्यादेखील मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत .
नितिन पंडीत
भिवंडी ( दि. ४ ) कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून भिवंडी शहर सर्वत्र परिचित आहे . कापड उद्योग मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायजिंग कंपन्यादेखील मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत . विशेष म्हणजे सध्या या डाईंग सायजिंग कंपन्यांच्या बॉयलारमध्ये प्लास्टिक कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असून यामुळे शहरातील नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. विशेष म्हणजे वारंवार तक्रारी करूनदेखील या कंपन्यांवर नियंत्रण असणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या गंभीर समस्येकडे पुरता दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत .
भिवंडी शहरात सुमारे सात लाख यंत्रमाग असून शहरात तब्बल ८० हुन अधिक सायझिंग कंपन्या आहेत . ज्यात ८० हुन अधिक बॉयलर असून ते २४ तास जळत असतात . या बॉयलर मध्ये दगडी कोळसा व लाकूड जळण्याचे आदेश असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हेतुपुरस्कर दुर्लक्षा मुळे अनेक सायझिंग बॉयलर मध्ये प्लास्टिक कचरा ,कपड्याच्या चिंध्या जाळण्यासाठी वापरत असल्याचे समोर येत आहे. या प्लास्टिक व चिंध्यांमुळे निर्माण होणारा धूर हा मानवास घातक ठरत असल्याने त्यामुळे श्वसनाचे, डोळ्यांचे विकार नागरीकांना जडत आहेत.भिवंडी शहरातील अनेक नागरी वस्तीत या सायझिंग असल्याने त्याचा मोठा त्रास या परिसरात राहणाऱ्या नागरीकांना होत असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिका प्रशासन या दोघांचेही सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. वास्तविक या बॉयलर मध्ये जाळण्यासाठी वापरण्यात येणारा दगडी कोळसा १० रुपये किलो तर लाकूड ५ रुपये किलो ने मिळत असल्याची माहिती माल्ट असून त्यापेक्षा प्लास्टिक अवघ्या कचरा २ रुपये किलो दराने मिळत असल्याने स्वतः इंधनाच्या लालसेपोटी सायझिंग चालक या घातक प्लास्टिक व चिंध्यांचा वापर बॉयलर मध्ये करीत आहेत . हा प्लास्टिक जाळल्याने त्या पासून निघणार रासायनिक घटक असलेला धूर हा नागरीकां सह शहरातील पर्यावरणास मारक ठरत आहे.
विशेष म्हणजे भिवंडी सह ठाणे मुंब्रा ,कल्याण डोंबिवली येथील भंगार व्यवसायिकांची टोळी हा प्लास्टिक कचरा भिवंडी शहरातील सायझिंग चालकांना पुरवीत असून रात्री आठ ते सकाळी आठ वाजताच्या दरम्यान हे कृत्य केले जात असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत असूनही प्रदूषण नियंत्रण मंडळासह स्थानिक मनपा प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे काही डाईंग सायजिंग या शहरालगतच्या ग्रामीण भागात असल्याने तिथेही मोठ्या प्रमाणात बॉयलर मध्ये प्लास्टिक व कापडी चिंध्या जळाल्याचे प्रकार समोर येत आहेत .