भाज्यांच्या लागवडीसाठी सांडपाण्याचा वापर; तातडीने कारवाई करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:55 IST2020-01-15T00:54:54+5:302020-01-15T00:55:41+5:30
श्रीकांत शिंदेंची होती तक्रार

भाज्यांच्या लागवडीसाठी सांडपाण्याचा वापर; तातडीने कारवाई करण्याचे आदेश
ठाणे : रेल्वे ट्रॅकनजिक, तसेच ठाणे शहरातील विविध ठिकाणी भाजीचे मळे असून या भाजीपाल्यांसाठी सांडपाणीमिश्रित पाणी वापरले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यानुसार मंगळवारी महापौर नरेश म्हस्के यांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवार यांच्या उपस्थितीत सर्व सहाय्यक आयुक्त व विविध विभागाची बैठक घेतली. दूषीत पाणी वापरून भाज्यांची लागवड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या गंभीर प्रकरणाबाबत तक्रार केली असल्याचे महापौरांनी बैठकीत सांगितले. या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेविका मालती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरु ध्द माळगांवकर, प्रदूषणनियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान तसेच सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त उपस्थीत होते.
रेल्वे ट्रॅकजवळच्या मोकळ्या जागेत तसेच शहराच्या बहुतांश ठिकाणी भाजीचे मळे आहेत. याठिकाणी बोअरवेल असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मात्र पिकांसाठी मलमूत्रमिश्रीत सांडपाणी पाणी देण्यात येते. याचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असतो.
येथे आहेत भाज्यांचे मळे : ठाणे महापालिका क्षेत्राचा विचार केल्यास कळवा, मुंब्रा व दिवा तसेच ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या समता नगर, गांधीनगर, सिडको, मफतलाल कम्पाउंड, परिसरात भाजीमळे असून यातून पिकविलेली भाजी ठाण्यातील विविध विभागात विकली जाते. ती पिकवण्यासाठी तसेच धुण्यासाठी सांडपाणी मिश्रीत पाण्याचा वापर केला जात आहे, अशा पद्धतीने नागरिकांच्या जीवाशी खेळून भाज्यांची लागवड केली जात आहे, याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून कॅन्सर, पोटाचे विकार, मेंदूचे विकार यासारख्या दुर्धर आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले.