गरोदर, स्तनदा स्त्रियांसाठी टेस्ट, ट्रीटमेंट आणि टॉक या त्रिसूत्रीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:39 AM2021-07-29T04:39:34+5:302021-07-29T04:39:34+5:30

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मातामृत्यू रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले असून मुख्य कार्यकारी अधिकारी ...

Use of triad of test, treatment and talk for pregnant and lactating women | गरोदर, स्तनदा स्त्रियांसाठी टेस्ट, ट्रीटमेंट आणि टॉक या त्रिसूत्रीचा वापर

गरोदर, स्तनदा स्त्रियांसाठी टेस्ट, ट्रीटमेंट आणि टॉक या त्रिसूत्रीचा वापर

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मातामृत्यू रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशाने मातामृत्यू रोखण्यासाठी गरोदर, स्तनदा मातांची टेस्ट, ट्रीटमेंट (चाचणी आणि उपचार) करण्याबरोबर महिलांशी आरोग्यदायी संवादही (टॉक) साधला जाणार आहे. बुधवारी या उपक्रमाची सुरुवात शहापूर तालुक्यात करण्यात आली. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी गरोदर माता, स्तनदा माता, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्याशी आरोग्यदायी संवाद साधला.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहापूर गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या नेतृत्वाखाली शहापूर आरोग्य विभागाने अतिजोखमीच्या गरोदर मातांच्या तपासणीसाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार केला असून मातामृत्यू रोखण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा २८ जुलैपासून सुरू झाला आहे. यामध्ये ८ ग्रॅमपेक्षा कमी हिमोग्लोबीन (रक्त) असलेल्या ७२ अतिजोखमीच्या गरोदर मातांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याकडून एकाच दिवशी उपकेंद्र स्तरावर संपूर्ण तपासणीनंतर निष्कर्षाची पाच टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये रक्तवाढीच्या गोळ्यांची आवश्यकता, इंजेक्शनची आवश्यकता, आयर्न सुक्रोस किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन तसेच मोठे आजार असलेल्या माता आदी निष्कर्षनिहाय विभागणी केली जाणार आहे.

या आहेत तपासणी तारखा

या तपासणीत स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या विशेष उपचाराची गरज असलेल्या गरोदर मातांसाठी मोहीम संपल्यानंतर विशेष शिबिराचे आयोजनही करण्यात येणार आहे. यामध्ये २८ जुलै रोजी उपकेंद्र आवाळे येथे ११ गरोदर मातांची स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी केली गेली. २९ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाशिंद येथे गरोदर मातांची तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत केली जाणार आहे. त्याचबरोबर ३१ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा येथे स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभा, अघई व कसारा येथील गरोदर मातांची तपासणी केली जाणार आहे. २ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा येथे स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत डोळखांब, टाकीपठार, किन्हवली, शेंद्रूण व शेणवा येथील गरोदर मातांची तपासणी केली जाणार आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ यांची तपासण्याची वेळ दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत राहणार आहे. गरोदर मातांची ने-आण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन उपलब्ध राहणार आहे.

Web Title: Use of triad of test, treatment and talk for pregnant and lactating women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.