आपला शब्द जपून वापरावा : डॉ. प्रज्ञा दया पवार यांचा कवींना कानमंत्र
By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 2, 2023 04:20 PM2023-04-02T16:20:07+5:302023-04-02T16:20:22+5:30
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाणे शहर शाखा आणि कोमसाप युवाशक्ती शाखेने आयोजित केलेल्या ‘राजधानीतील कवी आणि कविता' या कार्यक्रमात पवार बोलत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आपल्या परिसरात, भोवताली काय चालले आहे, पुढे काय होईल याची जाणीव समाजाला करून देण्याचे मोठे काम कवी आणि लेखक करत असतात. आपला शब्द जपून वापरावा, हे सगळ्यात मोठे आव्हान आजच्या कवींसमोर आहे. फेसबूक, व्हॉटस् अपसारख्या सोशल मिडीयामुळे ते फार लवकर प्रसिद्ध होतात. झट की पट कविता, झट की पट प्रसिद्धी त्यांना मिळते असा कानमंत्र ज्येष्ठ कवियित्री डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी आजच्या कवींना दिला.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाणे शहर शाखा आणि कोमसाप युवाशक्ती शाखेने आयोजित केलेल्या ‘राजधानीतील कवी आणि कविता' या कार्यक्रमात पवार बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, माझ्या तीस-चाळीस वर्षांचा अनुभव मला सांगतो, की हा मार्ग खूप सोपा असला तरी कठीण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यभर पसरलेल्या मराठी वाङ्मयीन व्यवहाराचे विकेंद्रीकरण व्हावे, या भावनेनेच मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली.
कोमसाप हा एक वटवृक्ष आहे. त्याच्या असंख्य पारंब्यांमधून साहित्याो एक मोठंे झाड लांबवर पसरल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, कोमसाप शहर अध्यक्ष ऍड. मनोज वैद्य, युवाशक्ती अध्यक्षा प्रा. दीपा ठाणेकर, कोमसाप कार्याध्यक्षा नितल वढावकर उपस्थित होते. कोमसाप केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर, प्रसिद्धीप्रमुख जयु भाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाणे शहर अध्यक्ष मनोज वैद्य यांनी प्रास्ताविक केले. कविता लिहिताना तुम्हाला जे दिसते, जे सुंदर आहे ते सगळे बाहेरचे न लिहिता, मनामधले काय लिहिता, हे महत्त्वाचे असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी कोमसाप राजधानी पुरस्कार प्राप्त काही कवींच्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिक्षा बोर्डे तर आभार प्रदर्शन प्रा. मनीषा राजपूत यांनी केले.