खाण्याचा सोडा वापरून मूर्तीचे पूर्णपणे विसर्जन होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:44 AM2021-09-05T04:44:55+5:302021-09-05T04:44:55+5:30
ठाणे : गणेशोत्सव जवळ आला आहे. यंदा बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्याच मूर्ती मोठ्या प्रमाणात आहेत. या मूर्तींचे ...
ठाणे : गणेशोत्सव जवळ आला आहे. यंदा बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्याच मूर्ती मोठ्या प्रमाणात आहेत. या मूर्तींचे खाण्याचा सोडा वापरून घरच्या घरीच विसर्जन करता येते, असा प्रयोग पुण्यात झाला होता. परंतु, हा प्रयोग ठाण्यात मूर्तिकारांनी स्वतः न केल्याने बऱ्याचशा जणांना याची माहिती नाही. तर एका मूर्तिकाराने मात्र खाण्याच्या सोड्यामुळे मूर्ती पूर्ण विरघळत नाही, असे म्हटले आहे.
पुणे महापालिकेने पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी खाण्याच्या सोड्याचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने पीओपीच्या मूर्तींचे विघटन करण्याचे जाहीर केले. परंतु, ठाण्यात असा प्रयोग कोणत्याही मूर्तिकारांनी केलेला नसल्याचे तसेच ठाणे महापालिकेनेही तसे आवाहन केलेले नाही. मात्र, पर्यावरणदृष्टीने पीओपीपेक्षा शाडूच्या मातीच्या मूर्तींचा वापर करा, असे आवाहन मात्र महापालिकेने केले आहे.
१) पीओपीच्या मूर्तींचीच अधिक विक्री
पीओपी शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्ती
२०१९ ७०% ३०%
२०२० - ५५% ४५%
२०२१ ७०% ३०%
२) गेल्यावर्षीच्या भीतीमुळे पीओपीपेक्षा शाडू मूर्ती अधिक बनविल्या होत्या. त्यामुळे शाडूच्या मातीच्या मूर्तींची मागणी अधिक होती. यंदा परिस्थिती बदलली आहे. पीओपीची मागणी पुन्हा वाढली आहे, असे निरीक्षण मूर्तिकारांनी नोंदविले.
३) ४८ तासांत पीओपी मातीची मूर्ती विरघळूच शकत नाही. शाडूच्या मातीची मूर्ती विरघळण्यासाठीच दोन ते तीन दिवस लागतात. ४८ तासांत लाल मातीची मूर्ती विरघळते, असे मूर्तिकार म्हणाले.
४) खत म्हणून पीओपीच्या पाण्याचा वापर करणे अयोग्य आहे. कारण त्यात प्लास्टिक रंगांचा वापर असतो. शाडूच्या मातीचादेखील वापर करू शकत नाही, कारण ती माती चिकट होते आणि लाल मातीत ती मिसळत नाही. पीओपीचे पाणी खतासाठी घातक ठरेल, असे मत ठाण्यातील मूर्तिकारांनी नोंदविले.
५) यासंदर्भात व्हिडीओ व्हायरल झाल्यावर आम्ही हा प्रयोग घरी करून पाहिला. पण तो तितका यशस्वी झाला नाही. खरे तर पीओपीची मूर्ती घरच्या घरी कोणत्याही पद्धतीने विसर्जित करणे शक्यच नसते. आम्ही पीओपीची मूर्ती खाण्याचा सोडा पाण्यात टाकून विसर्जित करायला घेतल्यावर ती फक्त १५ ते २० टक्केच विरघळली. पीओपीसाठी जे रंग वापरतात त्याने ही प्रक्रिया उशिरा होते. पूर्वी पाण्याचे रंग आणि डिस्टेम्पर्ड रंग वापरत आता प्लास्टिक आणि अक्रेलिक रंग वापरतात, त्यामुळे या मूर्तीला विरघळायला वेळच लागतो.
- सचिन गावकर, मूर्तिकार