मास्क वापरल्याने ८० प्रकारच्या आजारांना बसला आळा; मास्क वापरून साथींचा फैलाव टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:10 PM2021-01-01T23:10:47+5:302021-01-01T23:11:01+5:30
कोविडवर नियंत्रण : मास्क वापरून साथींचा फैलाव टाळा
जितेंद्र कालेकर
ठाणे : कोविडसारख्या साथीच्या आजाराचा फैलाव थांबवण्यासाठी नियमित मास्क वापरणे, योग्य सामाजिक अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. मास्कचा नियमित वापर केल्याने कोविडचाच नव्हे तर अशा सुमारे ८० ते ९० प्रकारच्या आजारांवर नियंत्रण येऊ शकते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
नियमित मास्कचा वापर केल्यामुळे बाधित रुग्णामार्फत प्रादुर्भाव होणाऱ्या कोविड-१९ या साथीच्या आजारावर नियंत्रण आले आहे. त्यामुळे वेगाने पसरणाऱ्या या आजारापासून अनेकांचा बचाव झाला आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्याही आटोक्यात आहे. मास्क नसल्यास कोरोनाच नव्हे तर स्वाइन फ्ल्यू तसेच विषाणूचा (व्हायरस) ताप, क्षय आदी आजारांचाही धोका संभवतो. याशिवाय, प्लेग, न्यूमोनिया (फुफ्फुसाचा संसर्ग) असे अनेक आजार असून त्यावर नियंत्रण येत असल्याचे ठाण्यातील एमडी फिजिशियन डॉ. राहुल पांडे यांनी सांगितले. त्यामुळे नियमित मास्क वापरून साथीच्या आजारांचा फैलाव टाळा, असे आवाहनही त्यांनी केले. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात मनपा व पोलीसही कारवाई करत आहेत.
अनेक साथीच्या आजारांना घातला आळा
मास्कच्या वापरामुळे अनेक साथीच्या आजारांसह फंगल इन्फेक्शन नियंत्रणात आले. अनेक दुर्धर आजारही त्यामुळे रोखले गेले. क्षय (टीबी) यासारखा दुर्धर आजार कमी झाला. सर्दी, खोकल्याचे तसेच न्यूमोनियाच्या रुग्णांची संख्याही आटोक्यात आली. दम्याच्या रुग्णांना वायुप्रदूषणाचा तसेच विषारी वायूचाही त्रास होतो. परंतु, मास्कच्या वापरामुळे अशा रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.
विषाणूजन्य आजार
मास्क न लावल्यामुळे धुळीतून पसरणारे आजार, श्वसनाद्वारे होणारे आजार, एच-१ एन-१, इन्फ्ल्युएन्झा, स्वाइन फ्ल्यू, क्षय, सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांच्या संपर्कातून होणाऱ्या कोरोनासह इतर आजार पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळेच परदेशातून येणाऱ्या कोरोनाचाही बचाव करण्यासाठी मास्कचा आवर्जून वापर करा, असे आवाहन जाधव यांनी केले.