उत्तनच्या मच्छीमारांना व्यापाऱ्यांकडून 5 कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 04:20 PM2018-07-24T16:20:52+5:302018-07-24T16:21:11+5:30
उत्तनच्या मच्छीमारांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या ओल्या व सुक्या मासळीचे सुमारे ५ कोटी रुपये थकवल्याने हवालदिल झालेल्या मच्छीमारांनी सभागृह नेते रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची भेट घेतली.
मीरारोड – उत्तनच्या मच्छीमारांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या ओल्या व सुक्या मासळीचे सुमारे ५ कोटी रुपये थकवल्याने हवालदिल झालेल्या मच्छीमारांनी सभागृह नेते रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी सहकार्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने म्हटले आहे .
भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्याला उत्तन , पाली , चौक भागातील मच्छीमार हे पिढ्यान पिढ्या पारंपारिकरित्या मासेमारी व्यवसाय करतात. समुद्रातून मिळालेली मासळी प्रकारा नुसार वेगळी करून ओली मासळी किंवा मासळी सुकवून ती व्यापाऱ्यांना विकली जाते. परंतु, बरेच व्यापारी विश्वास संपादित करत चार - आठ दिवसांनी पैसे देतो असे सांगून विकलेल्या मासळीची पावती देतात किंवा देत हि नाहीत. मासळीचे पैसे देण्याचे आश्वासन देऊन देखील वर्ष न वर्ष मच्छीमारांना पैसे दिले जात नाहीत . काही व्यापारी तर उलट सुलट उत्तर देत तुम्हाला जे काही करायचे ते करून घ्या पैसे मिळणार नाहीत असे धमकावतात .
मच्छीमारांचे कष्टाचे पैसे न मिळण्यामुळे अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून आर्थिक दृष्ट्या मच्छीमार मोठ्या संकटात सापडला आहे. अश्या फसलेल्या मच्छीमारांच्या सोबत सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी नुकतीच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची भेट घेतली . या वेळी पाटील यांनी व्यापाऱ्यांनी केलेल्या फसवणुकीचे काही पुरावे देखील मांडले . व्यापाऱ्यांनी फसवणूक केलेल्या रकमेचा आकडा सुमारे ५ कोटी रुपयांच्या घरात असल्याचे पाटील म्हणाले . डॉ. महेश पाटील यांनी, उत्तन सागरी पोलीस ठाणे यांना योग्य चौकशी करून मच्छीमारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिल्याचे रोहिदास पाटील म्हणाले . यावेळी उत्तन येथील स्थानिक शिवसेना नगरसेवक एलायेस बांड्या, कोळी समाज उत्तन संघटनेचे संचालक स्टीफन कासुघर, इंड्री गंडोली, दर्या माता चर्चच्या संजीना भंडारी व मच्छीमार आदी उपस्थित होते .