उत्तनचा भाजीपाला आता ग्राहकांच्या दारी
By Admin | Published: January 13, 2017 05:50 AM2017-01-13T05:50:33+5:302017-01-13T05:50:33+5:30
येथील उत्तन-गोराई वेशीवर असलेल्या सावंतवाडी गावातील शेतकऱ्याचा भाजीपाला स्थानिक शेतकरी सावंत
भार्इंदर : येथील उत्तन-गोराई वेशीवर असलेल्या सावंतवाडी गावातील शेतकऱ्याचा भाजीपाला स्थानिक शेतकरी सावंत कुटुंबाने थेट ग्राहकांना विक्रीसाठी पश्चिमेच्या पोलीस ठाण्याजवळ असलेल्या भाजीबाजारात विक्रीसाठी आणला आहे. स्वस्त दरात भाजी मिळत असल्याने काही वेळातच ती संपते.
अनेक वर्षांपासून सावंत कुटुंबाची जमीन पडीक होती. सध्या परिसरात एका मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. त्या वेळी तेथे भार्इंदर येथील रहिवासी अनिल नोटीयाल यांनी सावंत यांना पडीक जमिनीवर भाजीपाल्याची शेती करण्याचा सल्ला दिला. परंतु, अनेकदा पिकाचे नुकसान झाल्यामुळे त्यांनी नोटीयाल यांना भागीदारीत शेती करण्याची सूचना केली. त्याला त्वरित होकार देत नोटीयाल यांनी आपल्या दैनंदिन चित्रीकरणासह काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या शेतीत स्वत:ला झोकून दिले. या भागीदारीच्या शेतीत चांगल्या दर्जाचा भाजीपाला पिकल्याने नोटीयाल यांनी भार्इंदर येथील भाजीपाला विक्रेत्यांना शेतातील भाजी घाऊक प्रमाणात विक्री करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्याला अत्यल्प भाव मिळू लागल्याने त्यातून शेतीचा खर्च भागेनासा झाला. त्यामुळे नोटीयाल व सावंत यांनी स्वत:च थेट ग्राहकांना भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. त्याची मुहूर्तमेढ बुधवारी रोवण्यात आली. या दोघांनी शेतातील ताजा भाजीपाला थेट पश्चिमेकडील पोलीस ठाण्याजवळच्या भाजीबाजारात विकण्यास सुरुवात केली. ताजा भाजीपाला रास्त दरात मिळू लागल्याने लगेचच विकली गेली. (प्रतिनिधी)