उत्तर प्रदेशचा तरुण लोकलमधून पडून जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:19 AM2019-08-31T00:19:48+5:302019-08-31T00:19:51+5:30
गर्दीमुळे गेला तोल : प्रकृती चिंताजनक
अंबरनाथ : उत्तर प्रदेशहून आपल्या कुटुंबासह एक्स्प्रेसने कल्याणला येऊन अंबरनाथ येथे आपल्या घरी जात असताना, शुक्रवारी सकाळी लोकलच्या दरवाजात गर्दीमुळे पडून एका तरुणाचा अपघात झाला आहे. सध्या या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी नोंद केली आहे.
राकेश साकेत हा तरुण आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेशहून कल्याण रेल्वेस्थानकावर उतरला. त्याच्यासोबत त्याची बहीणही होती. राकेशने गुरुवारी सकाळी कल्याणहून अंबरनाथला येण्यासाठी लोकल पकडली होती. मात्र, राकेशकडे बॅग असल्याने तो गर्दीत लोकलच्या दरवाजात उभा होता. त्यात लोकलच्या गर्दीमुळे राकेशचा तोल गेल्याने तो विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर रेल्वेस्थानकादरम्यान लोकलमधून खाली पडला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, त्याला उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये दाखल केले.
मात्र, राकेशच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.